उल्हासनगरात सत्संग व्यवस्थापकाचा मारहाणीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, तिघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 23:48 IST2020-08-27T23:48:06+5:302020-08-27T23:48:54+5:30
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उल्हासनगरात सत्संग व्यवस्थापकाचा मारहाणीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, तिघांविरोधात गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प नं-४ माणेरेगाव येथील राधास्वामी सत्संग व्यवस्थापकाला नाली पाण्याच्या वादातून तिघांनी मारहाण केल्याने, व्यवस्थापकाचा नालीत पडून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सदर प्रकार १८ आॅगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता घडला असून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात उशिराने तिघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ माणेरे गाव येथे राधास्वामी सत्संग दरबार आहे. १८ आॅगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता पप्पू भोईर, विशाल भोईर व अज्ञात व्यक्ती असे तिघे जण सत्संग दरबाराच्या प्रवेशद्वार जवळ जावून दरबाराचे चंदर मंगतानी यांना सत्सांगचे गेट उघड नाहीतर मारेल. अशी धमकी दिली. घाबरलेल्या मंगताणी यांनी सत्संग व्यवस्थापक जवाहरलाल यांना बोलावण्यासाठी गेले असता, रागाच्या भरात तिघांनी गेट वरून सत्संग दरबारात प्रवेश केला. दरबाराच्या आतमध्ये गेल्यावर चंदर मंगतानीं यांना मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच व्यवस्थापक जवाहरलाल यांनाही नालीचे पाणी बाहेर येत असल्याचा जाब विचारून मारहाण केली. त्यावेळी जवाहरलाल हे नाली पडून त्यांचा जागीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस तपास करीत असून चंदर मंगतानी यांच्या तक्रारी वरून विठ्ठलवाडी पोलिसांनी पप्पू भोईर, विशाल भोईर व एक अज्ञात साथीदार यांच्या विरोधात जवाहरलाल यांच्या मृत्यूस कारण ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकाराने खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.