धमक्या मिळाल्या, पण सत्य सोडलं नाही; महिला कॉन्स्टेबलने ९ पोलिसांना मिळवून दिली फाशीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:14 IST2026-04-09T12:55:12+5:302026-04-09T13:14:33+5:30
बाप-लेकाच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी ९ पोलिसांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात महिला कॉन्स्टेबलची साक्ष महत्त्वाची ठरली.

धमक्या मिळाल्या, पण सत्य सोडलं नाही; महिला कॉन्स्टेबलने ९ पोलिसांना मिळवून दिली फाशीची शिक्षा
Tamil Nadu Custodial Death: तमिळनाडूतील सथानकुलम येथे बाप-लेकाचा पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष हत्येने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या प्रकरणात तब्बल ६ वर्षांनंतर न्याय मिळाला असून, मदुराई न्यायालयाने ९ दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत एका महिला हेड कॉन्स्टेबल रेवती यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. स्वतः पोलीस दलात असूनही आपल्याच सहकाऱ्यांविरुद्ध उभे राहून त्यांनी दिलेली साक्ष या खटल्यात निर्णायक ठरली.
जून २०२० मध्ये, जेव्हा जग कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकले होते, तेव्हा थूथुकुडी जिल्ह्यातील सथानकुलम पोलीस स्टेशनमध्ये ही हादरवणारी घटना घडली होती. पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांनी मोबाईलचे दुकान ठरलेल्या वेळेपेक्षा थोडा वेळ जास्त उघडी ठेवले म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं.
कोठडीत अमानुष अत्याचार; रेवतीचा जबाब
कॉन्स्टेबल रेवतीने न्यायालयात दिलेली साक्ष अंगावर काटा आणणारी आहे. तिने सांगितले की, "मी रात्री ८:५० च्या सुमारास पोलीस स्टेशनवर पोहोचले, तेव्हा आतून अम्मा, खूप दुखतंय, प्लीज मला सोडून द्या असे ओरडण्याचे आवाज येत होते. पोलीस कर्मचारी जयराज आणि बेनिक्स यांना विवस्त्र करून बेदम मारहाण करत होते. त्यांच्या गुप्तांगावर बुटांनी वार केले जात होते. अमानुषतेचा कळस म्हणजे, पोलीस मध्येच दारू पिण्यासाठी थांबायचे आणि पुन्हा मारहाण सुरू करायचे." जेव्हा रेवतीने जखमी जयराज यांना कॉफी देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इतर पोलिसांनी ती हिसकावून फेकून दिली.
जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू झाला, तेव्हा पोलीस विभागात हे प्रकरण दाबण्याचे मोठे प्रयत्न झाले. ९ पोलीस अधिकारी आरोपी होते. अशा वेळी रेवतीने न्यायमूर्तींना सांगितले, "सर, मी सत्य सांगायला तयार आहे, पण मला माझ्या दोन मुलींच्या आणि नोकरीच्या सुरक्षिततेची हमी हवी आहे."
साक्ष नोंदवताना बाहेर जमा झालेले पोलीस कर्मचारी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना धमकावत होते आणि रेवतीवर शेरेबाजी करत होते. मात्र, कडक पोलीस बंदोबस्तात रेवतीने आपला जबाब नोंदवला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने प्रत्येक आरोपीची ओळख पटवून दिली.
सर्वोच्च न्यायालयाची चपराक
या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयानेही कडक भूमिका घेतली आहे. "पोलीस कोठडीतील मृत्यू हा व्यवस्थेवरील मोठा डाग आहे आणि देश आता हे सहन करणार नाही," असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबत राज्यांच्या दिरंगाईवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.