राजस्थान लैंगिक अत्याचाराचे धागेदोरे थेट जळगावपर्यंत; संबंधित तरुणाचा मोबाइल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 08:06 IST2023-01-09T08:05:41+5:302023-01-09T08:06:29+5:30
या प्रकरणात राजस्थानच्या पोलिसांच्या पथकाने जळगावात येऊन तपासणी केली आहे.

राजस्थान लैंगिक अत्याचाराचे धागेदोरे थेट जळगावपर्यंत; संबंधित तरुणाचा मोबाइल जप्त
जळगाव : राजस्थानमधील भिलवाडा येथील डांगमध्ये राहणाऱ्या सरजूदास महाराजांना एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक केल्यानंतर, या प्रकरणात राजस्थानच्या पोलिसांच्या पथकाने जळगावात येऊन तपासणी केली आहे. सरजूदास महाराज यांच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून त्यांना २९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्येच डांग येथून अटक करण्यात आली आहे.
जळगावातील एक तरुण सरजूदास महाराज यांच्या घोडास येथील आश्रमात कधी- कधी जात होता. यातून त्याची पीडित अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली. दोघांमधील व्हॉट्सॲप चॅटिंगमध्ये पीडित मुलीने सरजूदास हे दुष्कृत्य करीत असल्याचे जळगावच्या तरुणाला सांगितले होते. पोलिसांनी संबंधित तरुणाचा मोबाइल जप्त करत तपासणी केली असता, ही चॅटिंग मिळून आली आहेत.