विमा पॉलिसीजवर दावा करून पैसे हडप करणाऱ्या गँगचा संभळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन भावांनी दरियाब नावाच्या एका दिव्यांग व्यक्तीला कारने चिरडून मारलं जेणेकरून त्याचा ५० लाखांच्या विमा पॉलिसीचा दावा हडप करता येईल. यानंतर त्यांनी दावा करून लाखो रुपयेही हडप केले. दिव्यांग व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सुरुवातीला पुराव्याअभावी एफआर दाखल केला. ४ महिन्यांनंतर टाटाच्या एका लोन कंपनीने पोलिसांना माहिती दिली की दरियाब नावाच्या व्यक्तीच्या नावाने विमा दावा मागितला जात आहे. प्रकरण संशयास्पद वाटत होतं. कृपया प्रकरणाची चौकशी करा. त्यानंतर पोलीस पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान असं आढळून आले की दिव्यांग दरियाबची हत्या त्याच्या घरापासून २७ किलोमीटर अंतरावर करण्यात आली होती.
अशा परिस्थितीत असा प्रश्न निर्माण झाला की जर तो व्यक्ती चालू शकत नव्हता तर तो घरापासून २७ किलोमीटर अंतरावर कसा पोहोचला आणि अपघात कसा झाला? जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि संशयित लोकांची चौकशी केली तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. तपासात असं दिसून आले की हरिओम आणि बिनोद नावाच्या दोन भावांनी ऑक्टोबर-२०२३ पासून दिव्यांग दरियाबचा विमा काढण्यास सुरुवात केली होती. कारण दोघांनाही पैशांची गरज होती.
विमा काढण्याचा सल्ला पंकज राघव नावाच्या व्यक्तीने दिला होता. पंकज राघव हे अॅक्सिस बँकेत मॅक्स लाईफ इन्शुरन्स एजंट आहेत. राघवने दोन्ही भावांना चांगले CIBIL स्कोअर नसल्यामुळे कर्ज देण्यास नकार दिला होता. त्यांनी असेही म्हटले की, मरणासन्न अवस्थेत असलेल्या दिव्यांग व्यक्तीचा विमा उतरवून नंतर त्याला मारलं पाहिजे. तुम्हाला विम्याचा दावा मिळेल आणि कर्जाचीही गरज भासणार नाही.
यानंतर हरिओमने एका वर्षाच्या आत त्या दिव्यांग व्यक्तीचा विमा काढला आणि नंतर त्याची हत्या केली. हरिओम आणि त्याच्या भावाने प्रताप नावाच्या व्यक्तीला दिव्यांग व्यक्तीला मारण्यासाठी ५०,००० रुपयांची सुपारी दिली होता आणि त्याला मारण्यास सांगितलं होतं. हत्येनंतर, हरिओम आणि त्याच्या भावाने दिव्यांग व्यक्तीच्या नावाने घेतलेल्या ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विम्यांमधून १५ रुपयांची रक्कम हडप केली होती.
दोघांनाही उर्वरित रक्कम मिळू शकली नाही. तपासानंतर पोलिसांनी आतापर्यंत गँगशी संबंधित २५ जणांना अटक केली आहे. या गँगमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जबाबदारी एका एजन्सीला देण्यात आली आहे. पोलीस पथक इतर राज्यांमध्ये या गँगशी संबंधित लोकांची चौकशी करत आहे. इतर राज्यांमध्येही असे गुन्हे उघडकीस येऊ शकतात, असा पोलिसांचा दावा आहे.