बिहारच्या समस्तीपूरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. कौटुंबिक तणाव आणि मानसिक दबावामुळे त्रस्त असलेल्या एका ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाने आपल्या सुसाइड नोटमध्ये पत्नी आणि सासरच्या मंडळींवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ही घटना पटोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनपूर सुरत गावात घडली आहे. दिग्विजय कुमार असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
घटनास्थळावरून पोलिसांना चार पानांची सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या वेदना, मानसिक छळ आणि पोटच्या मुलीपासून दूर राहण्याचे दुःख सविस्तरपणे मांडलं आहे. दिग्विजयने सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे की, त्याची पत्नी आणि सासरची माणसे त्याला सतत मानसिक त्रास देत होते. पत्नी राधिका त्याला बेरोजगारीवरून टोमणे मारायची, आपल्या मैत्रिणींच्या पतींशी त्याची तुलना करायची आणि सोशल मीडियावरील स्टेटस पाहून त्याच्याशी भांडण करायची, असा आरोप त्याने केला आहे.
पत्नीची मोठी बहीण नेहा या प्रकरणांत सर्वात जास्त हस्तक्षेप करायची आणि तिच्या सांगण्यावरूनच पत्नी आणि मुलीला घरातून नेण्यात आलं, असंही त्याने नमूद केलं आहे. दिग्विजयने पुढे लिहिलं की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी पत्नीचे वडील आणि भाऊ काही लोकांना घेऊन त्याच्या घरी आले होते आणि त्यांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर ते पत्नी आणि लहान मुलीला आपल्यासोबत घेऊन गेले. तेव्हापासून तो आपल्या मुलीला भेटू शकला नव्हता.
मुलीला पाहण्यासाठी तो व्हिडीओ कॉल करायचा, पण पत्नी मुलीचा चेहराही दाखवत नव्हती, ज्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. सुसाइड नोटमध्ये आपले आई-वडील आणि भावंडांची माफी मागताना त्याने लिहिलं की, तो एक चांगला मुलगा आणि भाऊ बनू शकला नाही. तो यूपीएससीची (UPSC) तयारी करत होता, मात्र कौटुंबिक वादाने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केलं.
आपल्या शेवटच्या इच्छेत त्याने लिहिलं की, त्याच्या मुलीचा सांभाळ त्याच्या भावाने करावा आणि तिच्या शिक्षणाची व लग्नाची जबाबदारी घ्यावी. तसेच, पत्नी आणि सासरच्या लोकांना शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्याने केली आहे. दुसरीकडे दिग्विजयच्या सासऱ्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत म्हटलं की, दिग्विजयने नोकरी करावी आणि जबाबदारी पार पाडावी एवढीच त्यांची इच्छा होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.