पोलिसांच्या कार्यक्षमतेला सलाम! दोन तासांत शोधून दिले डिक्कीत विसरेलेले सोन्याचे दागिने
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:59 IST2025-02-08T15:59:05+5:302025-02-08T15:59:38+5:30
सुटकेसमध्ये अडीच लाख रुपये किमतीचे ३२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, चेन, ब्रेसलेट असा सर्व ऐवज सापडला

पोलिसांच्या कार्यक्षमतेला सलाम! दोन तासांत शोधून दिले डिक्कीत विसरेलेले सोन्याचे दागिने
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : एका प्रवाशाचे कारमध्ये विसरलेले अडीच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अवघ्या दोन तासांत पोलिसांनी शोधून दिले. बोळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ही कार्यक्षमता दाखवली असल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून शनिवारी देण्यात आली. शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विरारच्या बोळींज नाका येथे राहणारे निलेश सोनी (२८) हे बोळींज पोलीस ठाण्यात आले. शुक्रवारीच घरी लग्न सोहळा असल्याने त्यांनी लग्न सोहळ्यातील सोन्याचे दागिने व कपडे सुटकेसमध्ये भरून घेत बोळींज नाका येथून भाड्याने एक आर्टिका कार केली. त्याच कारच्या डिक्कीत त्यांनी दागिने ठेवले आणि नातेवाईकांसह विरार ओव्हर ब्रीज जवळील चिमई हॉलवर पोहचले. पण कारच्या डिक्कीत ठेवलेले सोन्याचे दागिने व कपड्यांची बॅग कारमध्येच विसरल्याचे त्यांनी सांगितले.
निलेश सोनी यांच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी लागलीच त्या कारचा व कारचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या कारचा शोध घेतला. तो कारचालक कारसह वसईच्या गोखिवरे येथे सापडला. कार चालकाकडे पोलिसांनी विचारपूस केल्यावर त्याने त्याच्या कारच्या डिक्कीतील सुटकेसबाबत माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर डिक्की उघडून सुटकेस काढून दिली. पोलिसांनी सुटकेस उघडल्यावर त्यात अडीच लाख रुपये किंमतीचे ३२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, चेन, ब्रेसलेट असे सोन्याची सापडले. बोळींज पोलिसांनी हे सोन्याचे दागिने निलेश सोनी यांना अवघ्या दोन तासांत सुपूर्द केले आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले.