Sachin Vaze:Pradip Sharma had met BJP leader for Sachin Vaze to take him to the police service | Sachin Vaze: ‘तो’ भाजपा नेता कोण?; सचिन वाझेला पोलीस सेवेत घेण्यासाठी प्रदीप शर्मानं घेतली होती भेट

Sachin Vaze: ‘तो’ भाजपा नेता कोण?; सचिन वाझेला पोलीस सेवेत घेण्यासाठी प्रदीप शर्मानं घेतली होती भेट

ठळक मुद्देमुंबई गुन्हे शाखेचे तत्कालीन अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट वैयक्तिकरित्या त्या हॉटेलमध्ये बैठकीला आले होते. या बैठकीवेळी त्यांनी भाजपा नेत्याजवळ सचिन वाझेला पुन्हा पोलीस सेवेत घेण्याबाबत विनंती केली. परंतु भाजपा सरकारने त्याला विरोध केला होता.प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलातून राजीनामा देत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून नालासोपारा येथून निवडणूक लढवली होती

मुंबई – राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) आणि सीबीआय(CBI) वसुली रॅकेटच्या आरोपाची चौकशी करण्यात गुंतली आहे. याच तपासात आणखी एक खुलासा झाला आहे म्हणजे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेचे(Sachin Vaze) बॉस राहिलेले माजी पोलीस अधिकारी एन्काऊंटर किंग म्हणून प्रसिद्ध असलेले प्रदीप शर्मा(Pradeep Sharma) यांच्यात घनिष्ट संबंध होते. एक प्रमुख नेता आणि भाजपा आमदाराने सांगितले की, प्रदीप शर्मा यांनी २०१६ मध्ये त्यांचा निकटवर्तीय सचिन वाझेला वाचवण्यासाठी भाजपा सरकारशी संपर्क केला होता.

एका भाजपा आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ही बैठक मुंबई विमानतळाजवळील हॉटेल लीला येथे झाली होती. मुंबई गुन्हे शाखेचे तत्कालीन अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट वैयक्तिकरित्या त्या हॉटेलमध्ये बैठकीला आले होते. या बैठकीवेळी त्यांनी भाजपा नेत्याजवळ सचिन वाझेला पुन्हा पोलीस सेवेत घेण्याबाबत विनंती केली. परंतु भाजपा सरकारने त्याला विरोध केला होता.

प्रदीप शर्माचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाने वाझेला पोलीस दलात घेण्यासाठी थेट संपर्क साधला होता. मात्र सचिन वाझेवर कोर्टात सुनावणी सुरू आहे असं सांगत भाजपा नेतृत्वानं ही शिफारस अमान्य केली. सध्या NIA प्रदीप शर्माविरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न करत आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आली होती. या घटनेत प्रदीप शर्माचं सचिन वाझेला समर्थन असल्याचा संशय आहे. तपासादरम्यान, सचिन वाझेने तसे संकेत दिले होते की, प्रदीप शर्मा यांच्या माध्यमातून जिलेटिनच्या कांड्या खरेदी केल्या होत्या आणि स्फोटकं म्हणून त्याचा वापर केला होता. असं वृत्त नवभारत टाइम्सनं दिलं आहे.

मात्र वाझेचा हा दावा सिद्ध करण्यासाठी कोर्टात सबळ पुराव्याची गरज आहे. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या संबंधावर प्रतिक्रिया देताना भाजपा आमदार राम कदम म्हणाले की, शर्मा आणि वाझे यांच्यात गुन्हेगारी संबंध असण्यावर मी काहीही बोलू शकत नाही. परंतु प्रदीप शर्मा हे सचिन वाझेचे मार्गदर्शक होते, हे सत्य आहे. पोलिसांमध्ये हे सगळ्यांना माहिती आहे.

कोण आहेत प्रदीप शर्मा?  

प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलातून राजीनामा देत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून नालासोपारा येथून निवडणूक लढवली होती. ते पीएस फाऊंडेशन नावाने एक एनजीओ चालवतात. ज्याला सचिन वाझेसारख्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे सहकार्य आहे. प्रदीप शर्मा यांचे सचिन वाझेच्या पोलीस मुख्यालयातील गुन्हे शाखेत कायम येणे जाणे होते. मनसुख हिरेन(Mansukh Hiren) हत्येच्या चौकशीत सहभागी असणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात प्रदीप शर्माची भूमिका संशयास्पद वाटते. शर्मा यांचे फक्त वाझेसोबत नव्हे तर इतर आरोपींसोबत महत्त्वाची बैठक घेतली होती ज्यांनी या गुन्ह्याला अंतिम स्वरूप दिले. प्रदीप शर्मा मार्चच्या पहिल्या आठवड्यातही पोलीस मुख्यालयात वाझेच्या भेटीसाठी आले होते. हिरेन यांच्या हत्येत सहआरोपी असणाऱ्या विनायक शिंदेसोबतही शर्मा यांची भेट झाली.

प्रदीप शर्मा आणि सचिन वाझेचं शिवसेना कनेक्शन

प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे सुरुवातीच्या काळात एकत्र काम करत होते. सचिन वाझेने २००७ मध्ये शिवसेनेत प्रवेश घेतला. तर २०१९ मध्ये प्रदीप शर्माने शिवसेनेत प्रवेश घेऊन आमदारकीची निवडणूक लढवली होती. शिवसेना सत्तेत आल्यानंतर निलंबित सचिन वाझेला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यात आले. प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हे गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी होते ज्यांनी दाऊद इब्राहिमच्या अनेक शार्प शूटरचा खात्मा केला होता. सचिन वाझेने ६० पेक्षा अधिक तर प्रदीप शर्माने ३०० हून अधिक एन्काऊंटर केल्याचं सांगितलं जातं. प्रदीप शर्मा एन्काऊंटर किंग म्हणून ओळखलं जातं.

Web Title: Sachin Vaze:Pradip Sharma had met BJP leader for Sachin Vaze to take him to the police service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.