ठाण्यात बॉम्बची अफवा, अज्ञात बॅगेमुळे पोलिसांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 14:01 IST2022-06-03T12:23:06+5:302022-06-03T14:01:46+5:30
Suspicious Bag found : याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षास माहिती दिल्यानंतर त्यांच्या पथकासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.

ठाण्यात बॉम्बची अफवा, अज्ञात बॅगेमुळे पोलिसांची धावपळ
ठाणे : ठाण्यात आज सकाळी महापालिका मुख्यालयाच्या गेट क्रमांक २समोर असलेल्या झाडाखाली एक अज्ञात बॅग आढळल्याने खळबळ माजली. याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षास माहिती दिल्यानंतर त्यांच्या पथकासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. नंतर बॅगेची पाहणी केल्यानंतर "फ्रेश टू होम" या कंपनीची डिलिव्हरी बॅग असल्याचं निष्पन्न झालं. ही बॅग नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेट नंबर २ समोर कचराळी तलाव जवळ एका बेवारस बॅगेने एकच घबराट पसरली होती. यावेळी बॉम्ब शोधक पथक व श्वान पथकाच्या मदतीने त्या बॅगेची तपासणी केल्यावर ती रिकामी असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी सर्वच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ही बॅग डिलिव्हरी करणाऱ्या एका कंपनीची असल्याचे समोर आले आहे.
महापालिका मुख्यालयात कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासाने म्हणजे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास, मुख्यालयाच्या गेट क्रमांक २ समोरील झाडाखाली एक बेवारस बॅग आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे मुख्यालयासह आजूबाजूच्या तसेच कचराळी तलाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी , नौपाडा पोलीस, ठाणे नगर पोलीस, बॉम्ब शोधक नाशक पथक तसेच श्वानपथक, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. बॉम्ब शोधक नाशक पथक व श्वान पथकाच्याच्या मदतीने त्या बेवारस बॅगेची तपासणी करण्यात आली. त्या बॅगेमुळे कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची खात्री पटल्यावर नागरिकांसह महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तसेच, ही बॅग "फ्रेश टू होम" या कंपनीची डिलिव्हरी बॅग असून ती बॅग नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.