अटेंडंट बनून AC कोचमध्ये शिरला चोर; १५ मिनिटांत केली २० लाखांची चोरी; बंद CCTV'मुळे आरोपीला पकडण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:52 IST2025-11-13T13:30:40+5:302025-11-13T13:52:34+5:30
सूर्यनगरी एक्सप्रेसमध्ये दिवसाढवळ्या सुमारे २० लाख रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अटेंडंट बनून AC कोचमध्ये शिरला चोर; १५ मिनिटांत केली २० लाखांची चोरी; बंद CCTV'मुळे आरोपीला पकडण्याचे आव्हान
Rajasthan Crime: मुंबईहून जोधपूरकडे जाणाऱ्या 'सूर्यनगरी एक्सप्रेस'मध्ये दिवसाढवळ्या सुमारे २० लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाली आणि लूणी रेल्वे स्टेशनच्या अवघ्या १५ मिनिटांच्या प्रवासात चोरट्यांनी ही चोरी केली. सेकंड एसी कोचमधून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, हिरे आणि मोबाईल फोनसह सुमारे २० लाख रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्या. महत्त्वाचे म्हणजे ज्या एसी कोचमध्ये चोरी झाली त्यामधील सीसीटीव्ही बंद होते. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
जोधपूर येथील नरेंद्र जैन आणि त्यांची पत्नी दीपा मेहता यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला.. त्यांच्या बॅगेतून जवळपास १२ तोळे सोने आणि हिऱ्यांचे मौल्यवान दागिने, १ लाख रुपये रोख आणि एक आयफोन असा एकूण सुमारे २० लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. नरेंद्र जैन यांनी जीआरपीकडे नोंदवलेल्या तक्रारीनुसार, ते एका धार्मिक कार्यक्रमासाठी जोधपूर आणि एका लग्नासाठी बालोतरा येथे जात होते. मंगळवारी बांद्रा टर्मिनलवरून ते निघाले. पाली स्टेशनपर्यंत त्यांच्याजवळ असलेली बॅग सुरक्षित होती, कारण ते जागे होते. मात्र, पालीहून लूणीपर्यंतचा फक्त १५ मिनिटांचा प्रवास सुरू असताना ही चोरी झाली.
अटेंडंट बनून एसी कोचमध्ये शिरला संशयित
नरेंद्र जैन यांनी पोलिसांना सांगितले की, चोरी झाल्याचे लक्षात येताच ते धावत बाहेर आले. तेव्हा गेटजवळ एक संशयित व्यक्ती उभा होता, जो जनरल तिकीट घेऊन एसी कोचमध्ये शिरला होता आणि स्वतःला 'ट्रेन अटेंडंट' म्हणून सांगत होता. जैन यांनी त्याला पकडून टीसीकडे नेले असता, त्याने आपण अटेंडंट नसल्याचे सांगितले आणि तो तिथून पळून गेला. नरेंद्र जैन यांनी टीसीकडे रेल्वे थांबवण्याची मागणी केली किंवा पोलिसांना बोलावण्यास सांगितले. परंतु, टीसीने मदतीऐवजी त्यांनाच चेन खेचल्यास कारवाई करण्याची धमकी दिली, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे टीसीनेही त्यांना मदत केली नाही.
यानंतर दीपा मेहता यांनी रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर संताप व्यक्त केला आहे. कोचमध्ये आरपीएफचा एकही जवान तैनात नव्हता. अटेंडंटने दरवाजे लॉक असल्याचे सांगितले, तरी संशयित व्यक्ती बाहेर पडला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जोधपूरला पोहोचल्यावर तपासणी केली असता, कोचमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे उघड झाले. रेल्वेचे सुरक्षेचे दावे फोल असल्याचे दीपा मेहता यांनी सांगितले. याप्रकरणी जीआरपीने गुन्हा दाखल केला असून आरोपी आणि चोरीच्या दागिन्यांचा शोध सुरू आहे, पण सीसीटीव्ही बंद असल्याने आरोपीला पकडणे मोठे आव्हान असणार आहे.