उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, तीन वर्षांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत झाला. मौदहा पोलीस स्टेशन परिसरात एका व्यसनी पतीने त्याची २७ वर्षीय पत्नी रोशनीला लोखंडी रॉडने मारहाण केली. हत्येनंतर त्याने त्यांच्या दीड वर्षाच्या मुलाला मृतदेहासह खोलीत बंद केलं आणि पळून गेला.
हमीरपूर जिल्ह्यातील मौदहा पोलीस स्टेशन परिसरातील कामहरिया गावात ही धक्कादायक घटना घडली. मोइनुद्दीन असं या व्यक्तीचं नाव असून त्याने रोशनीची हत्या केली. शनिवारी रात्री या जोडप्यात कशावरून तरी वाद झाला. यानंतर व्यसनी पतीने तिला लोखंडी रॉडने मारहाण केली. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, जवळच्या लोकांना मुलाच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी दार उघडलं आणि आत प्रवेश केला.
खोलीतील दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि त्यांनी ताबडतोब या घटनेची पोलिसांना माहिती दिली. मुलाच्या शेजारी त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनी तीन वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केलं होतं आणि त्यांना दीड वर्षांचा एक मुलगा आहे. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी रोशनीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस अधीक्षक (एसपी) हमीरपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणता अधिक तपास केला जात आहे. मोइनुद्दीनला ड्रग्सचं व्यसन होतं.