राहायला बंगला, फिरायला थार, हातात रोलेक्स घड्याळ; 'त्या' महिला कॉन्स्टेबलला पुन्हा अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:46 IST2025-05-28T19:44:21+5:302025-05-28T19:46:51+5:30
Punjab Women constable Arrested: पंजाब पोलिसांनी पुन्हा एकदा इन्स्टाक्वीन महिला कॉन्स्टेबल अमनदीप कौरला अटक करण्यात आली.

राहायला बंगला, फिरायला थार, हातात रोलेक्स घड्याळ; 'त्या' महिला कॉन्स्टेबलला पुन्हा अटक
पंजाब पोलिसांनी पुन्हा एकदा इन्स्टाक्वीन महिला कॉन्स्टेबल अमनदीप कौरला अटक करण्यात आली.उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याच्या कारणावरून कॉन्स्टेबलवर कारवाई करण्यात आली. पंजाब पोलिसांच्या दक्षता पथकाने तिच्याकडून १.३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता जप्त केली. एका कॉन्स्टेबलची इतकी संपत्ती पाहून अधिकारीही आश्चर्यचकित झाले.
पंजाब पोलिसांनी अमनदीप कौरला आधीच बडतर्फ केले. आता तिची मालमत्ता गोठवण्यात आली, ज्यात एक आलिशान बंगल्याचाही समावेश आहे, ज्याची किंमत ९९ लाख रुपये आहे. अमनदीप कौर हिचा भटिंडा येथील आणखी एका पॉश सोसायटी ड्रीम होममध्ये १२०.८३ यार्डचा प्लॉट आहे, ज्याची अंदाजे किंमत १८.१२ लाख रुपये आहे. याशिवाय, अमनदीप कौर हिच्याकडे एसयूव्ही थार पीबी ०५ एक्यू ७७२० कार आहे, ज्याची किंमत १४ लाख रुपये आहे.
याशिवाय, बडतर्फ करण्यात आलेल्या कॉन्स्टेबलकडे रॉयल एनफील्ड मोटारसायकल, आयफोन १३ प्रो मॅक्स, आयफोन एसई, विवो मोबाईल आणि रोलेक्स घड्याळ आहे, या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत, अशी माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व सरकारी आकडे असून बाजारात त्यांची किंमत जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
पोलीस वर्दीचा गैरवापर केल्याचा आरोप
अमनदीप कौरला या वर्षी २ एप्रिल रोजी पंजाब पोलिसांनी १७ ग्रॅम हेरॉइनसह अटक केली होती, त्यानंतर तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले . अमनदीपवर पोलीस वर्दीचा गैरवापर आणि ड्रग्ज व्यवसाय करण्याचा आरोप करण्यात आला.