मनोरा आमदार निवासस्थानी चोरी; एका तरुणास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 23:58 IST2019-02-23T23:57:34+5:302019-02-23T23:58:13+5:30
22 फेब्रुवारीला पोलिसांनी आमदार निवासस्थानात गस्ती घालत असताना एक तरुण संशयीतरित्या फिरत असताना त्यांना सापडला.

मनोरा आमदार निवासस्थानी चोरी; एका तरुणास अटक
मुंबई - नरीमन पाईंट येथील मनोरा आमदार निवासस्थानात चोरी केल्याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी 30 वर्षीय तरुणाला अटक केली. निलेश कर्नावट असे अटक आरोपीचे नाव असून तो जळगाव येथील रहिवासी आहेत. त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणातील तक्रारदार नेताजी पाटील हे सांगलीतील शेतकरी असून त्यांच्या कामासाठी जानेवारीत मुंबईत आले होते. त्यावेळी ते मनोरा आमदार निवासस्थानात वास्तव्याला होते. 7 जानेवारीला त्यांनी झोपण्यापूर्वी त्यांची पॅण्ट काढून बेडरूमध्ये ठेवली होती. सकाळी त्यातील पाकीट गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यात 42 हजार रुपये रोख रक्कम होती. याप्रकरणी पाटील यांनी कफ परेड पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 22 फेब्रुवारीला पोलिसांनी आमदार निवासस्थानात गस्ती घालत असताना एक तरुण संशयीतरित्या फिरत असताना त्यांना सापडला. सुरूवातीला त्यांने त्याचे नाव प्रवीण पाईल सांगितले. पोलिसांनी त्याने सांगितलेल्या गावी त्याची चौकशी केली असता असा कोणताही व्यक्ती त्यांच्याकडे राहत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावेळी चौकशीत त्याने निलेश कर्नावट असे त्याचे नाव असून त्याने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आमदार निवासस्थानी चोरी केल्याचे सांगितले.