समलिंगी संबंधातून तरुणाला लुटले; पुण्यातील सिंहगड रोडवरील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 19:37 IST2020-08-30T19:37:05+5:302020-08-30T19:37:47+5:30
फिर्यादीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तो घाबरुन गेला होता. ही बाब त्याने आपल्या एका मित्राला सांगितले़ मित्राने त्याला धीर देऊन पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले़

समलिंगी संबंधातून तरुणाला लुटले; पुण्यातील सिंहगड रोडवरील प्रकार
पुणे : समलैंगिक संबंध ठेवण्याच्या हव्यासापोटी गेलेल्या विवाहित तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील ८१ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना धायरी येथील डीएसके विश्व ते नांदेड फाटा दरम्यानच्या एका खोलीत ९ आॅगस्ट रोजी घडला होता़ ही बाब घरात समजल्यास आपला संसार मोडेल, या भितीने या तरुणाने कोणाला हा प्रकार सांगितला नव्हता. मित्राने धीर दिल्यानंतर त्याने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हा एका गे साठींच्या अॅपवर चॅटिंग करत असताना त्याला रवी नावाच्या एकाने हाय मेसेज पाठविला़ त्याला फिर्यादीने कोठे आहे, अशी विचारणा केली़ त्यावर त्याने डीएसके रोडला असल्याचे सांगत एका ठिकाणी जागा आहे, असे सांगितले़ त्या ठिकाणी सकाळी साडेअकरा वाजता फिर्यादी गेला़ तेथे त्याला रवी नावाचा तरुण भेटला. दोघे जण एकत्र असताना तिघे चौघे तलवार, काठ्या घेऊन त्यांच्या खोलीत शिरले़ त्यांनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी, दांडक्याने मारहाण केली़ तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली़
त्यानंतर फिर्यादीकडील १० हजार रुपये, सोन्याच्या दोन अंगठ्या, चांदीच्या दोन अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतल्या़ त्यानंतर त्यांनी गुगल पे द्वारे व एटीएमचा पिन नंबर जबरदस्तीने घेऊन त्याद्वारे पैसे काढून ८१ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला़
फिर्यादीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तो घाबरुन गेला होता़ ही बाब त्याने आपल्या एका मित्राला सांगितले़ मित्राने त्याला धीर देऊन पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले़ त्यानुसार त्यांनी पोलिसांकडे रविवारी फिर्याद दिली आहे़ गे अॅपच्या माध्यमातून कट रचून, मारहाण करुन लुटल्याचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे़ फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरुन आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे सिंहगड रोड पोलिसांनी सांगितले.