विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओस नागरिकांनी बदडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 19:28 IST2019-07-18T19:28:10+5:302019-07-18T19:28:37+5:30
मैत्री करण्यासाठी दबाव टाकत महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणाºया युवकास कळमेश्वर येथील बसस्थानकावर नागरिकांनी चोप दिला.

विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओस नागरिकांनी बदडले
नागपूर - मैत्री करण्यासाठी दबाव टाकत महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणा-या युवकास कळमेश्वर येथील बसस्थानकावर नागरिकांनी चोप दिला. यानंतर नागरिकांनी त्याला पोलीसांच्या स्वाधीन केले. संदीप निंबुरकर (२५) रा.गोधणी, नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही विद्यार्थिनी कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील राहणारी आहे. ती नागपूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जुलै रोजी कळमेश्वर बसस्थानकावर या युवकाने संबंधित मुलीला मैत्री करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी तिने त्यास नकार दिला होता. गुरुवारी ही मुलगी नेहमीप्रमाणे नागपूर येथे महाविद्यालयात जाण्याकरीता कळमेश्वर बस स्थानकावर उभी होती. त्यावेळी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान संदीपने तिला पुन्हा गाठले. त्याने पुन्हा एकदा या मुलीला मैत्री करण्याचा आग्रह केला. यावर तिने मी आपल्याला ओळख नसल्याने मैत्री करणार नसल्याचे सांगितले. यावर त्याने भडकत मुलीला अश्लील शिविगाळ केली. हा प्रकार बसस्थानकावर उभ्या असलेल्या नागरिकांनी पाहिला. नागरिकांनी युवकाला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रतिसाद देत नसल्याने संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला. यानंतर त्याला कळमेश्वर येथील पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.
नागरिकांनी पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. यावर पोलिसांनी आरोपी संदीप विरुद्ध भांदविच्या कलम ३५४ (ड), २९४ अन्वये गुन्हा दाखल करीत अटक केली. घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक सुशील धोपटे करीत आहे. बसस्थानकावरील काही नागरिकांनी या घटनेचे व्हीडोओ शुटींग केले. यानंतर हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला. व्हिडीओ व्हायरल होताच झालेल्या प्रकाराची सर्वत्र निंदा करण्यात येत आहे. अशा युवकांना याच पद्धतीने धडा शिकविणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.