पोलिसांकडून रिक्षाचालकाला मारहाण; तळीरामांना पळवताना घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 00:02 IST2020-06-30T00:02:15+5:302020-06-30T00:02:28+5:30
नवी मुंबईत लॉकडाऊन असल्याचे अफवांचे पीक रविवारी उठले होते. यामुळे तळीरामांनी परिसरातल्या मद्यविक्री केंद्रांबाहेर गर्दी केली होती.

पोलिसांकडून रिक्षाचालकाला मारहाण; तळीरामांना पळवताना घडला प्रकार
नवी मुंबई : मद्यविक्री केंद्राबाहेरील जमाव पांगवताना पोलिसांनी रिक्षाचालकाला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये रिक्षाचालकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घणसोली रेल्वेस्थानकासमोरील मद्यविक्री केंद्राबाहेर हा प्रकार घडला आहे.
नवी मुंबईत लॉकडाऊन असल्याचे अफवांचे पीक रविवारी उठले होते. यामुळे तळीरामांनी परिसरातल्या मद्यविक्री केंद्रांबाहेर गर्दी केली होती. अशाच रेल्वे स्थानकासमोरील मद्यविक्री केंद्राबाहेर मोठ्या संख्येने ग्राहकांची गर्दी झाली होती. मागील अनेक दिवसांपासून बहुतांश मद्यविक्री केंद्राबाहेरच सर्रास मद्यविक्री होत आहे. त्यानुसार याठिकाणी देखील ग्राहकांनी गर्दी केली होती. परंतु पोलिसांना माहिती मिळताच एक पथक त्याठिकाणी आले असता, जमावाने पळ काढला. यावेळी पोलिसांकडून सरसकट तिथे दिसणाऱ्यांवर लाठीचार्ज होत असताना एका रिक्षाचालकांच्या डोक्यावर काठी लागली. यामध्ये तो रक्तबंबाळ झाला. हा रिक्षाचालक भाडे घेऊन त्याठिकाणी आला होता असे समजते. त्याने पोलिसांकडून कमरेच्यावर झालेल्या हल्ल्यावर आक्षेप घेतला असता जमावाने देखील पोलिसांच्या कृत्याविषयी नाराजी व्यक्त केली. यावेळी उपस्थित काही व्यक्तींनी संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काढल्याने हा प्रकार उघडकीस आला.
घटनास्थळापासून काही अंतरावरच लॉकडाऊन असताना देखील नियमित चायनीस सेंटर चालवले जात आहेत. त्यासंदर्भात अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. यानंतरही पोलीस कारवाई का करत नाहीत असाही प्रश्न उपस्थित होतो. मद्यविक्रेत्यांकडून आॅनलाइन ऐवजी थेट अर्धवट शटर उघडे ठेवून मद्यविक्री होत असतानाही त्यांना पाठीशी घालण्यामागच्या कारणांवरही शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे रिक्षाचालकावर झालेल्या हल्याप्रकरणी चौकशीची मागणी होत आहे.