रियाची सलग 9 तास चौकशी; सीबीआयने उद्या पुन्हा बोलावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 22:28 IST2020-08-30T22:28:09+5:302020-08-30T22:28:27+5:30
रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात सीबीआयचे अधिकारी असलेल्या डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहचले.

रियाची सलग 9 तास चौकशी; सीबीआयने उद्या पुन्हा बोलावले
मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणातील मुख्य संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यामागील सीबीआयचा ससेमिरा कायम राहिला आहे. रविवारी सलग तिसऱ्या दिवशी तिची विशेष पथकाकडून सुमारे नऊ तास चौकशी करण्यात आली.
तिच्यासह भाऊ शौविक, सुशांतचा मॅनेजर सम्युयल मिरांडा, मित्र सिद्धार्थ पिठानी, श्रुती मोदी यांचीही झाडाझडती घेण्यात आली. सुशांतचा पैशांचा त्यांच्याकडून झालेला वापर आणि ड्रग कनेक्शनच्या अनुषंगाने त्यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
तपासाचा आजचा दहावा दिवस
रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात सीबीआयचे अधिकारी असलेल्या डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहचले. तिच्यासमवेत तिचा भाऊ शौविक होता. त्यांना मुंबई पोलिसांकडून एस्कोर्ट पुरविण्यात आली होती. दुपारी 12.30 च्या सुमारास सिद्धार्थ पिठाणी मॅनेजर सॅम्युअल मिरांडा हे त्याठिकाणी पोहचले. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास श्रुती मोदीही त्या ठिकाणी आली. या सर्वांना एकत्रित बसवून चौकशी करण्यात आली.
रात्री आठपर्यंत त्यांच्याकडे विचारणा करण्यात येत होती. त्यानंतर आजची चौकशी थांबविण्यात आली. त्यांना सोमवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.