Crime News: निवृत्त पोलिसाकडून दोन मुलांवर गोळीबार; ऐरोलीतली घटना, एकाची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 07:18 IST2021-06-15T07:17:38+5:302021-06-15T07:18:43+5:30
भगवान यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. त्यांनी या पिस्तूलद्वारे काही महिन्यांपूर्वी मेहुणा व माजी नगरसेवक राजू पाटील यांनादेखील धमकावले होते, असेही समजते. यावेळी पोलिसांनी त्यांचे पिस्तूल जप्त केल्यानंतर पुन्हा ते ताब्यात दिले होते.

Crime News: निवृत्त पोलिसाकडून दोन मुलांवर गोळीबार; ऐरोलीतली घटना, एकाची प्रकृती चिंताजनक
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सेवानिवृत्त पोलिसाने स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्याची घटना सोमवारी ऐरोली येथे घडली. यामध्ये मोठ्या मुलाला तीन गोळ्या लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून, दुसऱ्या मुलाच्या शरीराला घासून गोळी गेली आहे. घटनेनंतर रबाळे पोलिसांनी वडिलाला पिस्तुलासह ताब्यात घेतले असून, गोळीबार करण्यामागच्या कारणांची चौकशी सुरू आहे.
सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऐरोली सेक्टर ३ येथील रो हाऊसमध्ये ही घटना घडली. त्या ठिकाणी राहणाऱ्या भगवान पाटील या निवृत्त सहायक उपनिरीक्षक यांनी वसई येथे राहणाऱ्या स्वतःच्या मोठ्या मुलाला काही कामानिमित्त घरी बोलावून घेतले होते. त्यानुसार मोठा मुलगा विजय हा घरी आला होता. यावेळी लहान मुलगा सुजय हा घरात होता. त्यानंतर काही वेळातच भगवान यांनी स्वतःकडील पिस्तूलमधून विजय याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी विजयच्या पोटात घुसली असून, दुसरी गोळी खांद्यातून आरपार गेली आहे, तर तिसरी गोळी हाताला लागून गेली. त्यानंतर भगवान यांनी लहान मुलगा सुजय याच्यावर गोळी झाडली असता त्याने स्वतःच्या बचावाचा प्रयत्न केल्याने त्याच्या पोटाला गोळी घासून गेली.
भगवान हे निवृत्त पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी त्यांचे जप्त केले पिस्तूल पुन्हा त्यांना ताब्यात दिले होते. याच पिस्तूलमधून त्यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांवर गोळीबार केला. त्यात मोठा मुलगा विजय याची प्रकृती चिंताजनक आहे.
रबाळे पोलिसांनी भगवान पाटील यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्तूल देखील जप्त केले आहे. कोणत्या कारणासाठी त्यांनी हा गोळीबार केला याची चौकशी पोलीस करीत आहेत.
मेहुण्यालाही धमकावले होते
भगवान यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. त्यांनी या पिस्तूलद्वारे काही महिन्यांपूर्वी मेहुणा व माजी नगरसेवक राजू पाटील यांनादेखील धमकावले होते, असेही समजते. यावेळी पोलिसांनी त्यांचे पिस्तूल जप्त केल्यानंतर पुन्हा ते ताब्यात दिले होते.