धोकादायक कामास जुंपलेल्या ३ बालकामगारांची भाईंदरमधून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 20:00 IST2022-12-10T19:58:17+5:302022-12-10T20:00:21+5:30
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या एका औद्योगिक वसाहतीमध्ये इलेक्ट्रिक लोखंडी भट्टी, प्रेस व कटिंग मशीनवर जीवाला धोका होईल अशा कामास ...

धोकादायक कामास जुंपलेल्या ३ बालकामगारांची भाईंदरमधून सुटका
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या एका औद्योगिक वसाहतीमध्ये इलेक्ट्रिक लोखंडी भट्टी, प्रेस व कटिंग मशीनवर जीवाला धोका होईल अशा कामास जुंपलेल्या ३ बालकामगारांची सुटका पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने केली आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदर पूर्वेच्या मच्छी मार्केट जवळ उद्योग इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये पारस इन्टरप्रायझेस नावाने बालकामगारांकडून धोकादायक काम करून घेतले जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक समीर अहिरराव सह केशव शिंदे, विजय निलंगे, उमेश पाटील, नमिता यादव यांच्या पथकाने गुरुवार ८ डिसेम्बर रोजी गाळ्यावर छापा टाकला.
त्यावेळी आतमध्ये मूळच्या उत्तर प्रदेश मधील १ अल्पवयीन मुलास स्टील वाट्याना गरम करण्यासाठीच्या इलेक्ट्रिक भट्टीवर तर २ अल्पवयीन मुलांना इलेक्ट्रिक प्रेस व कटिंग मशीनवर जीवाला धोका होईल अश्या कामास जुंपलेले आढळून आले.
व्यवस्थापक किशनकुमार यादव याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता अल्पवयीन मुलांना ते कमी पगारात काम करत असल्याने कामावर ठेवले जाते असे सांगितले. तर कारखान्याचा मालक जसवंत हा सापडला नाही. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात जसवंत व यादव वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.