धक्कादायक! धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 06:41 AM2023-02-15T06:41:20+5:302023-02-15T09:24:12+5:30

एकास अटक : मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Recruitment of bogus clerks in the Ministry in the name of Dhananjay Munde | धक्कादायक! धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती

धक्कादायक! धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती

googlenewsNext

मनीषा म्हात्रे 

मुंबई : मंत्रालयातून चालणाऱ्या बनावट भरतीचे धक्कादायक रॅकेट उघड झाल्यानंतर आता माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र देत मंत्रालयातील कर्मचारी लिपिक भरतीचे रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले आहे. बोगस लिपिक भरती रॅकेटप्रकरणी गोवंडी पोलिसांनी एका मंत्रालयीन कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे. याप्रकरणी निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकरविरोधात गुन्हा नोंदवत माळवेला अटक करण्यात आली आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत चौकशी सुरू असल्याचे गोवंडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन रघुनाथराव होनवडजकर यांनी सांगितले.

पालिकेतून सेवानिवृत्त झालेले यशवंत लक्ष्मण कदम (६७) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ते गोवंडी येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. कदम यांच्या एम.एस्सी. झालेला लहान मुलगा रत्नजित याने व्हॉट्सॲपवर सरकारी नोकरीसंदर्भातील जाहिरात बघून निखिल माळवे याच्याशी संपर्क साधला. माळवे याने त्याला थेट मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात लिपिकपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला मुलाखतीसाठी ३० हजारांची मागणी केली. माळवे याने सोशल मीडियावर धनंजय मुंडे हे सामाजिक न्यायमंत्री असताना त्यांच्या कार्यालयाबाहेर काढलेले फोटो सोशल मीडियावर ठेवून विश्वास संपादन केला. रत्नजितला मंत्रालयात मुलाखतीसाठी बोलावून तेथे शुभम मोहिते याच्याशी भेट घालून दिली. मोहितेने तो मुंडे यांच्या कार्यालयात शिपाई असल्याचे सांगितले. तो व्हॉट्सॲप डीपीलाही मुंडेंच्या फोटोचा वापर करत होता. मंत्रालयात कांबळे नावाच्या व्यक्तीला भेटून कागदपत्रे दिली. त्याने कागदपत्रे तपासली. १ डिसेंबर २०२१ रोजी धनंजय मुंडे यांच्या नावाचे बनावट आदेशपत्र रत्नजितला मेल केले. तात्पुरत्या स्वरूपात निवड झाली असून, २९ जानेवारी २०२१ पर्यंत सदर कार्यालयात उपस्थित राहून नोकरी आदेश प्राप्त करून सेवेस प्रारंभ करण्यास सांगितल्याचे त्यात नमूद होते. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला.

ठरलेल्या तारखेनुसार, रत्नजित मंत्रालयात गेला. मात्र शुभम नॉट रिचेबल झाला. तसेच तो मुंडे यांच्यासोबत दौऱ्यावर गेल्याच्या बहाण्याने चालढकल केली. त्यानंतर, नीलेश कुडतरकर नावाच्या व्यक्तीने फोन करून मंत्रालयातील काम १०० टक्के होणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. 

निष्पक्ष चौकशी व्हावी 
शुभम मोहिते नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. अशी कुठलीही व्यक्ती कार्यरत नव्हती. तसेच देण्यात आलेले आदेशपत्रही बनावट आहे. अशाप्रकारे आदेशपत्र देण्यात येत नाही. यामध्ये बनावट सही -शिक्क्यांचा वापर करण्यात आला असून, याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. आम्ही याबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चौकशीची मागणी करणार आहोत.
- धनंजय मुंडे, माजी सामाजिक न्यायमंत्री

कोरोनामुळे नोकरी गेली. लग्नही होत नव्हते. नोकरी लागणार म्हणून लग्नाची तारीखही ठरली. मात्र सरकारी नोकरीच्या जाळ्यात अडकलो. अनेकांची यामध्ये फसवणूक झाली आहे. 
- रत्नजित कदम, फसवणूक 
झालेला तरुण

आई झाली लंकेची पार्वती
कदम यांनी बचतीचे पैसे तसेच पत्नीचे सर्व दागिने गहाण ठेवून गेल्या वर्षी ७ लाख ३० हजार रुपये निखिल माळवेला दिले. आता पोलिस स्टेशनच्या पायऱ्या झिजविण्याची वेळ आली आहे. पेन्शनमधून व्याजाचे हप्ते जात आहेत. अवघ्या ६ ते ७ हजारांत कुटुंबाचा गाडा चालवित आहोत. एक ते दीड वर्ष सतत पाठपुरावा केल्यानंतर गुन्हा दाखल केला. 
- यशवंत लक्ष्मण कदम, तक्रारदार

Web Title: Recruitment of bogus clerks in the Ministry in the name of Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.