मालकिणीचे 'खासगी व्हिडीओ' पुरवण्याचा कट? आमदाराने ३० लाखांचे आश्वासन देऊन पीएला 'गुप्तहेर' बनवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:18 IST2025-10-14T13:15:40+5:302025-10-14T13:18:38+5:30
आंध्र प्रदेशातील एका चालकाच्या हत्या प्रकरणाने राजकीय वळण घेतल्याने खळबळ उडाली आहे.

मालकिणीचे 'खासगी व्हिडीओ' पुरवण्याचा कट? आमदाराने ३० लाखांचे आश्वासन देऊन पीएला 'गुप्तहेर' बनवले
Kota Vinuta Driver Suspicious Death Case: आंध्र प्रदेशातील राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या रायडू हत्या प्रकरणात तेलगू देशम पक्षाचे आमदार बोज्जाला सुधीर रेड्डी यांचे नाव समोर आले आहे. चेन्नई पोलिसांनी पीए श्रीनिवासुलू उर्फ रायडू याच्या हत्येप्रकरणी जनता सेना नेत्या विनुथा कोटा आणि त्यांचे पती चंद्राबाबू यांना अटक केली आहे. याच अटकेनंतर आमदार सुधीर रेड्डी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चेन्नईतील कूवम नदीत रायडूचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या हत्येप्रकरणी विनुथा आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात आली. अटकेनंतर विनुथा यांनी आमदार बोज्जाला सुधीर रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुधीर रेड्डी यांनी रायडूला आपल्याविरोधात गुप्तहेर म्हणून वापरले आणि आपली खासगी माहिती मिळवण्यासाठी त्याला पैसे दिले, असा दावा विनुथा यांनी केला आहे.
जुलै महिन्यात चेन्नईच्या कुम नदीत सापडलेल्या श्रीनिवासुलू उर्फ रायडू याच्या मृतदेहाने आंध्र प्रदेशच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. रायडू जनसेना पक्षाच्या नेत्या विनुथा कोटा यांचा चालक आणि पीए होता. रायडू याचा मृतदेह ८ जुलै रोजी नदीतून सापडला. रायडूच्या गळ्यावर आणि शरीरावर व्रण होते. पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण ब्लॅकमेलींगचे असल्याचे म्हटले होते. रायडूवर विनुथाशी संबंधित वैयक्तिक आणि राजकीय माहिती लीक केल्याचा आरोप होता. या आधारे पोलिसांनी विनुथा कोटा, तिचा पती चंद्राबाबू आणि इतर तिघांना अटक केली.
मात्र रायडूचा मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेला सुमारे २० मिनिटांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण पूर्णपणे बदलले. व्हिडिओमध्ये रायडूने टीडीपीचे आमदार बोज्जला सुधीर रेड्डी यांचे नाव घेतले. सुधीर रेड्डीने विनुथाच्या जवळच्या लोकांना तिच्या आणि तिच्या पतीचे खाजगी किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ फुटेज मिळवून दिल्यास ३० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. व्हिडीओ समोर येताच हे प्रकरण वैयक्तिक वादापासून राजकीय कटात बदलले.
काय आहे नेमके प्रकरण?
विनुथा कोटा यांच्या जबाबातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. बोज्जाला सुधीर रेड्डी यांनी रायडूला हेर म्हणून पेरले होते आणि त्याला यासाठी ३० लाख रुपये दिल्याचेही सांगण्यात आले. रायडू हा विनुथा यांच्या खासगी हालचाली आणि माहिती सुधीर रेड्डी यांना पुरवत होता, ज्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले. याच वादातून विनुथा आणि त्यांच्या पतीने रायडूचा खून केल्याचा पोलिसांचा दावा आहे.
आमदाराने आरोप फेटाळले
या आरोपांवर बोज्जाला सुधीर रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी हे सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगून फेटाळून लावले आहेत. आपल्याविरोधात बदनामीची मोहीम चालवली जात असून या हत्येशी आपला कोणताही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले. उलट, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माध्यम आपल्याला लक्ष्य केले जात आहे, असाही आरोप सुधीर रेड्डी यांनी केला.