फेशियलच्या नावाने ब्युटीशियनवर बलात्कार; ५० हजारांसाठी ब्लॅकमेलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 10:25 IST2022-03-07T10:25:01+5:302022-03-07T10:25:29+5:30

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे ब्युटीपार्लर असून डिसेंबर २०२१ मध्ये तिची गणेश चौधरी याच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यातून मैत्री निर्माण झाली. पुढे त्याचे रुपांतर सतत चॅटिंग व भेटीत होऊ लागले.

Rape of a beautician in the name of facials in Jalgoan | फेशियलच्या नावाने ब्युटीशियनवर बलात्कार; ५० हजारांसाठी ब्लॅकमेलिंग

फेशियलच्या नावाने ब्युटीशियनवर बलात्कार; ५० हजारांसाठी ब्लॅकमेलिंग

जळगाव : शहरातील ब्युटीशियन असलेल्या महिलेला फेशियलच्या नावाने हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून गणेश प्रकाश चौधरी (वय ४८,रा.तुळसाई नगर, जळगाव) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे ब्युटीपार्लर असून डिसेंबर २०२१ मध्ये तिची गणेश चौधरी याच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यातून मैत्री निर्माण झाली. पुढे त्याचे रुपांतर सतत चॅटिंग व भेटीत होऊ लागले. जानेवारी महिन्यात गणेश याने महिलेला डी मार्ट परिसरात बोलावून मोबाईल भेट दिला. त्यावेळी माझ्या नातेवाईकाचे लग्न आहे, माझे फेशियल करुन दे असे गणेश याने महिलेला सांगितले. तिने होकार दिल्यानंतर गणेश याने काव्यरत्नावली चौकाकडे बोलावले. तेथे आज फेशियल करुन दे म्हणून त्याने महिलेला तिच्याच दुचाकीवरुन भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये नेले. तेथे आधीच गणेशच्या नावाने खोली बुक होती. तेथे फेशियल करुन दिल्यानंतर गणेश याने दोन वेळा महिलेशी जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. 

या घटनेनंतर यापुढे माझ्याशी संबंध ठेवू नको असे महिलेने त्याला बजावले, मात्र तरी देखील त्याने पुन्हा पुन्हा फोन करुन झाल्याप्रकाराची माफी मागितली. त्यानंतर महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून पुन्हा फोनवर बोलणे सुरु केले. यानंतर फेब्रुवारी महिन्यात फोन करुन पुन्हा अबंर नील ग्राउंडवर बोलावले व त्या दिवशी त्याच हॉटेलमध्ये नेऊन दोन वेळा शारिरीक संबंध ठेवले.

असे केले ब्लॅकमेलिंग..
या घटनेमुळे महिलेने गणेश याच्याशी संपर्क तोडला. अशातच २८ फेब्रुवारी रोजी त्याने दुसऱ्या क्रमांकावरुन फोन करुन माझा फोन का घेत नाही? बोलायचे नसेल तर माझा मोबाईल परत कर असे सांगितले. त्यामुळे ही महिला मोबाईल परत करण्यासाठी त्याच ग्राउंडवर गेली. तेथे त्याने आपल्यातील संबंधाचे व्हिडीओ तयार केले आहेत, तू मला ५० हजार रुपये दे नाही तर शरीरसंबंध ठेव असे सांगून पतीला व्हिडीओ दाखविण्याची धमकी दिली. यावेळी त्याने महिलेला मारहाणही केली. ३ मार्च रोजी महिलेच्या पतीला फेसबुकवर मेसेज टाकून ५० हजार रुपयांची मागणी केली. या प्रकारामुळे पतीने विचारणा केल्यावर तिने झाल्या प्रकाराची संपूर्ण माहिती दिली. त्यानुसार शनिवारी रात्री गणेश याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Rape of a beautician in the name of facials in Jalgoan