Rape in UP: घरी गळफास घेऊन मुलीची आत्महत्या; बलात्कार झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 02:00 IST2020-10-15T02:00:14+5:302020-10-15T02:00:51+5:30
उत्तर प्रदेश : अत्याचार न झाल्याचा पोलिसांनी केला दावा, तीन जणांना अटक

Rape in UP: घरी गळफास घेऊन मुलीची आत्महत्या; बलात्कार झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
चित्रकूट : उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यामध्ये बलात्कारपीडित दलित मुलीने (१५) मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याच राज्यातील हाथरस जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणाने देशभर संताप उसळला असतानाही अशा घटना थांबण्यास तयार नाहीत.
चित्रकूट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित मित्तल यांनी सांगितले की, या दलित मुलीने तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या ८ ऑक्टोबरला गावानजीकच्या जंगलामध्ये या मुलीवर तीन जणांनी बलात्कार केला होता, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर चित्रकूट जिल्ह्यात ज्या गावी हे प्रकरण घडले तेथील माजी सरपंचाचा मुलगा किशन उपाध्याय व आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या बलात्कारपीडित दलित मुलीची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली, असा तिच्या कुटुंबियांनी केलेला आरोप पोलिसांनी फेटाळला आहे. दलित मुलीवर झालेल्या बलात्काराची तक्रार याआधी तिच्या एकाही नातेवाईकाने येऊन नोंदविली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. चित्रकूटमधील दलित मुलीवर बलात्कार झालेला नाही, असा निष्कर्ष तिच्या शवचिकित्सा अहवालात काढण्यात आला आहे, अशी माहिती चित्रकूट पोलिसांनी दिली आहे. तिच्या उत्तरीय तपासणीसाठी वापरलेल्या नमुन्यांची आता फोरेन्सिक तपासणीही होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दलित मुलीवर बुधवारी तिच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. हाथरस जिल्ह्यातील दलित मुलीवर झालेल्या बलात्कारानंतरही त्या राज्यात बलात्काराच्या आणखी घटना दररोज उजेडात येत आहेत.
पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही
उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या दलित मुलीच्या वडिलांनी आरोप केला की, तीन जणांनी माझ्या मुलीचे अपहरण करून तिला गावानजीकच्या जंगलात नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हात-पाय बांधलेल्या अवस्थेत तिला तसेच टाकून आरोपी तिथून निघून गेले. सरतेशेवटी पोलिसांनी तिला शोधून काढले व घरी आणून सोडले. मात्र, तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही.