उत्तर प्रदेशातील रामपूरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. काकीच्या प्रेमात पडलेल्या एका तरुणाने विषप्राशन करून आपला जीव दिला. मिल्कखानम पोलीस स्टेशन परिसरातील शादी नगर हाजिरा गावात ही घटना घडली. विजयपाल असं या २६ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मजुरी करायचा. या घटनेने कुटुंबीयांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
विजयपालचे चार मुलांची आई असलेल्या त्याच्या काकीसोबत प्रेमसंबंध होते. रविवारी तो काकीला बाजपूरला फिरायला घेऊन गेला. संध्याकाळी घरी परतल्यानंतर कुटुंबाला हे समजलं तेव्हा घरात मोठं भांडण झालं. काकाने पत्नीला शिवीगाळ केली आणि तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनी शिवीगाळ करण्यात आली. हा वाद पुढे टोकाला गेला आणि यावरून हाणामारी झाली.
कुटुंबाच्या रागाने दुखावलेला विजयपाल सोमवारी रात्री उशिरा पुन्हा त्याच्या काकीकडे गेला आणि म्हणाला की, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन. यानंतर त्याने विषारी पदार्थ खाल्ला. काही वेळातच त्याची प्रकृती बिघडू लागली, ज्यामुळे घरात गोंधळ निर्माण झाला. त्याने टोकाचं पाऊल उचल्याने कुटुंबीयांना धक्का बसला.
विषप्राशन केल्यानंतर तरुणाची प्रकृती बिघडू लागली. त्याला उपचारासाठी आधी स्वार रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे त्याची प्रकृती गंभीर असलेली पाहून डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात रेफर केलं. मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान विजयपालचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.