नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:49 IST2025-12-12T12:47:46+5:302025-12-12T12:49:26+5:30

परदेशात स्थायिक होण्याच्या स्वप्नाने एका तरुणाला इतके हैवान बनवले की, तो वर्षभरापासून स्वतःच्या वडिलांना मारण्याचा कट रचत होता.

rajkot youth arrested for plotting father murder and get insurance money to settle in israel | नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा

नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा

राजकोटमधील भायावदार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. परदेशात स्थायिक होण्याच्या स्वप्नाने एका तरुणाला इतके हैवान बनवले की, तो वर्षभरापासून स्वतःच्या वडिलांना मारण्याचा कट रचत होता. अनेक प्रयत्नांनंतरही वडील वाचले तेव्हा त्याने कुऱ्हाडीने त्यांची हत्या केली. नात्यांना काळीमा फासणारी ही घटना खूप भयानक आहे.

इस्रायलमध्ये स्थायिक होण्याच्या लालसेपोटी वडिलांच्या हत्येचा कट रचणाऱ्या २५ वर्षीय रामदे जोग या तरुणाला भायावदार पोलिसांनी अटक केली आहे. त्याने त्याचा चुलत भाऊ वीरम (३९) याच्यासोबत मिळून केवळ आपले वडील काना यांच्या हत्येचा कट रचला नाही, तर हत्येनंतर विम्यातून मिळणाऱ्या ६०-७० लाख रुपयांनी इस्रायलमध्ये स्थायिक होण्याची योजना आखली होती.

धोराजी विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक सिमरन भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार, रामदेने पोलिसांना सांगितलं की, तो एका वर्षापासून वडिलांना मारण्याचा कट रचत होता. हा कट पूर्ण करण्यासाठी त्याने वडिलांच्या नावावर जीवन विमा पॉलिसी घेतली होती, ज्यातून त्यांच्या मृत्यूनंतर ६० ते ७० लाख रुपये मिळणार होते. यासाठी त्याने त्याचा चुलत भाऊ वीरमला तयार केलं.

पुढील प्रीमियम भरण्याची तारीख जवळ आल्यावर, रामदेने वीरमला विश्वासात घेऊन १ लाख रुपये रोख आणि आयुष्यभर मोफत जेवण देण्याचं आमिष दाखवलं आणि वीरम तयार झाला. यानंतर वीरमने चुलत्यावर दोन वेळा हल्ला करून त्यांचा मृत्यू अपघात असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला, मात्र तपासात त्याचा खोटेपणा उघड झाला. या घटनेच्या सहा महिन्यांपूर्वी काना यांनी ४ एकर जमीन विकून ते पैसे रामदेला दिले होते, पण रामदेने ते पैसे मौज-मजा करण्यात उधळले.  त्याने एक एसयूव्ही देखील खरेदी केली होती

८ डिसेंबर रोजी रामदेने वडिलांना ठार मारण्यासाठी थंड पेयात विष मिसळून दिले, पण वडील वाचले. यानंतर वीरमने चुलत्याला उंदीर मारण्याचे औषध मिसळलेले कोल्ड्रिंक पाजले, पण यावेळीही काना यांना उलट्या झाल्या आणि ते बचावले. तेव्हा रामदेने वडिलांना कुऱ्हाडीने संपवण्यास सांगितलं. ९ डिसेंबर रोजी वीरम काना यांना शेतात दारू पिण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. तिथे त्याने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर अनेक वार करून त्यांची हत्या केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: rajkot youth arrested for plotting father murder and get insurance money to settle in israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.