बाप नव्हे सैतान! मुलाच्या हव्यासापोटी 5 महिन्यांच्या जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 20:39 IST2025-03-28T20:38:26+5:302025-03-28T20:39:19+5:30
पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात.

बाप नव्हे सैतान! मुलाच्या हव्यासापोटी 5 महिन्यांच्या जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून मारले
Rajasthan Crime : मुलाच्या हव्यासापोटी एखादा व्यक्ती किती क्रुर बनू शकतो, हे राजस्थानमधील प्रकरणातून समोर आले आहे. सीकरमधील नीमकथाना येथे मुलगा व्हावा, या इच्छेसाठी एका बापाने आपल्या पाच महिन्यांच्या जुळ्या मुलींची निर्घृणपणे हत्या केली. अशोक कुमार यादव असे आरोपीचे नाव आहे. त्याने दोन्ही निष्पाप मुलींना जमिनीवर आपटले, त्यामुळे दोघींचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीने केला पोलिसांना फोन...
मुलीची आई अनिता यादव यांनी सांगितले की, तिने पाच महिन्यांपूर्वीच जुळ्या मुलींना जन्म दिला होता. जुळ्या मुलींना पाहून नवरा पहिल्या दिवसापासून संतापलेला होता. पती आणि सासू दररोज टोमणे मारायचे. 27 मार्च रोजी अशोक आणि अनिताचे भांडण झाले, यावेळी रागाच्या भरात त्याने दोन्ही जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून मारले. हे पाहून अनिता जागेवर बेशुद्ध पडली.
मुलींची हत्या केल्यानंतर आरोपी अशोकने मृतदेह पुरला होता, मात्र मुलींची आई अनिता यादव यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी गावात पोहोचून मुलींचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. यानंतर पोलिसांनी आरोपी अशोक कुमार यादवला ताब्यात घेतले. आरोपी पती अशोक कुमार यादवला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी अनिताने पोलिसांकडे केली आहे.