फिल्म डायरेक्टरवर रोखली पिस्तूल; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 20:07 IST2019-05-11T20:06:25+5:302019-05-11T20:07:59+5:30
फिल्म डायरेक्टरने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चारही जणांविरुद्ध वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.

फिल्म डायरेक्टरवर रोखली पिस्तूल; गुन्हा दाखल
नालासोपारा - मुंबई - अहमदाबाद महामार्गावर एका हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादामुळे एकाने फिल्म डायरेक्टरवर पिस्तूल राखून त्यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. फिल्म डायरेक्टरने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चारही जणांविरुद्ध वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.
मीरा रोड येथील सृष्टी काँप्लेक्स मध्ये राहणारे श्रेय सतीश श्रीवास्तव (44) हे फिल्म डायरेक्टर आहे. यांचे नातेवाईक विनीत श्रीवास्तव कडून अमित पराशर यांनी काही पैसे घेतले होते पण ते पैसे परत करत नव्हते. याच विषयावरून 22 एप्रिलच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अमित ने विनीत याला मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार येथील हिल व्ह्यू हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते यावेळी विनीत सोबत फिल्म डायरेक्टर श्रेय श्रीवास्तव आले होते. पैश्याच्या देवाणघेवाणी वरून अमित आणि विनीत यांच्यात वादविवाद सुरू झाल्यावर श्रेय याने मध्यस्थी करून शांत करण्याचा प्रयत्न केला. अमित सोबत असलेले केशव मामा, शिवा आणि मन्या हे तिघे होते. या चौघांनी मिळून श्रेय यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व शिवाने त्याच्या जवळ असलेली पिस्तोल त्यांच्यावर रोखली आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले. घटना घडल्यानंतर विरार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी श्रेय आणि विनीत पोहचले पण पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता घरी पाठवून दिले. या घडलेल्या घटनेची कहाणी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना लेखी तक्रार दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार बुधवारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करून पिस्तूल रोखलेल्या आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांची विरार पोलिसांनी पाठराखण केल्याचा आरोपही श्रेय श्रीवास्तव यांनी केला आहे.