T20 World Cup 2021 Ind vs Pak : १९ ठिकाणी छापेमारी, डझनभर बुकी ताब्यात; पहिल्याच सामन्यात क्रिकेट सट्ट्याचा डाव उधळला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 00:50 IST2021-10-25T00:41:34+5:302021-10-25T00:50:24+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर नागपुरातून कोट्यवधींचा सट्टा लावला-घेतला जातो. नागपुरातील बुकी गोवा अन् थेट दुबईत कटिंग (उतारी) करतात. अनेक जण स्वत:कडेच लगवाडी ठेवून कोट्यवधींची हेरफेर करतात.

T20 World Cup 2021 Ind vs Pak : १९ ठिकाणी छापेमारी, डझनभर बुकी ताब्यात; पहिल्याच सामन्यात क्रिकेट सट्ट्याचा डाव उधळला!
नागपूर- क्रिकेट सट्ट्याच्या माध्यमाने कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या शहरातील बुकींवर छापेमारी करण्यात आली आहे. तब्बल १९ ठिकाणी पोलिसांनी ही छापेमारी केली. टी-२० च्या पहिल्या सामन्यात बेटिंगची तयारी करून बसले असतानाच पोलिसांनी बुकींना ताब्यात घेतले. यामुळे संपूर्ण डावच उधळला गेल्याने अनेकांनी नागपूरबाहेर धाव घेत स्वत:ला सेफ करून घेतले. (Cricket betting ruined in the first match)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर नागपुरातून कोट्यवधींचा सट्टा लावला-घेतला जातो. नागपुरातील बुकी गोवा अन् थेट दुबईत कटिंग (उतारी) करतात. अनेक जण स्वत:कडेच लगवाडी ठेवून कोट्यवधींची हेरफेर करतात. शहरातील भ्रष्ट पोलिसांकडून कारवाईपूर्वीच टीप मिळत असल्याने बुकींचे फावते. ते पकडले जात नाही. ही बाब ध्यानात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी टी-२०ची फटकेबाजी सुरू होण्यापूर्वीच नागपुरातील बुकींचा डाव उधळण्याची व्यूहरचना तयार केली होती. गुन्हे शाखेचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार, कारवाईसाठी १० पथके तयार करण्यात आली. भारत-पाकिस्तानचा सामना सुरू होण्याला काही वेळ शिल्लक असताना शहरातील जरीपटका, खामला, वर्धमाननगर, महाल तसेच विविध भागातील १९ ठिकाणी पोलिसांनी छापे मारले. रात्री ८ वाजेपर्यंत डझनभर बुकींना ताब्यात घेतले. त्यांच्यातील अनेकांचे गोवा आणि इतर राज्यातील बुकींशी कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्याकडून बड्या बुकींबाबतची माहिती घेतली जात आहे.
सहा बुकी ताब्यात,अनेकांचे पलायन -
फिरोज रफिक शेख (वय ४९, रा. शुक्रवार तलावाजवळ, गणेशपेठ), पीयूष अग्रवाल (वय ३६, रा. लकडगंज), अशोक उर्फ गुप्ता उर्फ तुलसीराम गुप्ता, राहुल रमेश अग्रवाल (वय ४६, रा. बजेरिया, गणेशपेठ), प्रवीणकुमार उर्फ चिंटू चाैरसिया (वय ३२, रा. गड्डीगोदाम) आणि सोनू चहांदे (वय ४५, रा. गड्डीगोदाम), अशी ताब्यात घेतलेल्या बुकींची नावे आहेत. दोन डझनपेक्षा अधिक बुकी शहर सोडून पळून गेले. त्यांनी रायपूर, पांढुरण्याकडे धाव घेतल्याचे उघड झाले आहे.
बुकींचा सरदार ग्रामीणमध्ये -
मध्यभारतातील बुकी बाजाराचा म्होरक्या अन् नागपुरातील सर्वात मोठा बुकी समजला जाणारा यावेळी अलेक्झांडरने नागपूर ग्रामीणमध्ये आपले राज्य सुरू केले आहे. त्याने यापूर्वी स्वत:सह अनेकांचे अड्डे थाटून आयपीएलच्या सीझनमध्ये हजारो कोटींची खयवाडी केली. पोलीस त्याच्या मुसक्या कधी बांधतात, त्याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.