Raid on Dawood Gang: ‘डी ट्रस्ट’ नावाने गोळा केले जात होते पैसे; देशविरोधी कारवायांसाठी निधी वापरल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 09:01 IST2022-05-10T09:01:43+5:302022-05-10T09:01:55+5:30
एनआयएने डी गँग संबंधात दाखल केलेला गुन्हा आणि ठाणे पोलिसांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने दाऊद कुटुंबीय आणि टोळीतील काहीजणांविरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल करत कारवाई केली.

Raid on Dawood Gang: ‘डी ट्रस्ट’ नावाने गोळा केले जात होते पैसे; देशविरोधी कारवायांसाठी निधी वापरल्याचा संशय
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘एनआयए’ने छोटा शकीलचा नातेवाईक सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याच्यासह हाजी अली आणि माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवानी, अब्दुल कय्युम आणि अन्य एकाला सोमवारी ताब्यात घेतले आहे. अब्दुल कय्युम ‘डी ट्रस्ट’ नावाने पैसे गोळा करत असल्याची माहिती समोर येत असून, याविषयी अधिक चौकशी सुरू आहे.
या ट्रस्ट अंतर्गत किती पैसे जमा झाले? त्याचा वापर कुठे आणि कसा झाला? आदींबाबत एनआयए अधिक तपास करत आहे. दुसरीकडे सुहेल खंडवानी हे बांधकाम क्षेत्रातील खंडवानी समूहात कार्यरत असून, ते माहीम आणि हाजीअली दर्ग्याचे विश्वस्त आहेत. १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी टायगर मेमन याचे खंडवानी साथीदार होते. याकुब मेमन याला काही वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली. तपास यंत्रणेने नोव्हेंबर १९९४मध्ये याकुबचे भागीदार असलेल्या खंडवानी यांच्याकडून ४४ लाख रुपये आणि मे १९९५मध्ये गोव्याच्या तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी खंडवानी यांना दिलेले ६० लाख रुपये जप्त केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर आता एनआयएने खंडवानी यांच्या मालमत्तांवर छापे टाकून त्यांना ताब्यात घेतले आहे.
एनआयएच्या कारवाईवरून ईडीचे अटकसत्र
एनआयएने डी गँग संबंधात दाखल केलेला गुन्हा आणि ठाणे पोलिसांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने दाऊद कुटुंबीय आणि टोळीतील काहीजणांविरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल करत कारवाई केली.
ईडीने या कारवाईत दाऊदचा खास हस्तक छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट याच्या घरीही छापे टाकून ताब्यात घेतले. ईडीने सलीम फ्रूट याच्याकडे चौकशी करतानाच इक्बाल कासकर याचा न्यायालयाकडून ताबा मिळवत त्याला अटक केली आहे.
त्यापाठोपाठ, ईडीने हसीना पारकर हिचा मुलगा अलिशहा पारकर याच्याकडेही चौकशी केली आहे. संबंधितांच्या चौकशीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे नाव समोर आल्यानंतर ईडीने छापे टाकत त्यांना अटक केली होती. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
सलीम फ्रूटची दुबईमार्गे पाकिस्तानला भेट
सलीम फ्रूट हा बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने अनेकवेळा दुबईमार्गे पाकिस्तानात गेल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तसेच तो दाऊद आणि शकीलच्या सांगण्यावरून डी कंपनीची मुंबईतील कामे करत असल्याचीही शक्यता तपास यंत्रणांना आहे.
खंडणी, अमली पदार्थांच्या तस्करीच्या माध्यमातून गोळा केलेला पैसा हवालामार्गे इतरत्र पाठवत दहशतवादी कारवाया
किंवा देशविरोधी कारवायांसाठी पाठवत असल्याचा तपास यंत्रणांना संशय असून, त्यादृष्टीनेही तपास सुरू आहे.
एनआयएने दाखल केलेल्या गुन्ह्यात दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीतील छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इकबाल मिर्ची, दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित मनी लाँड्रींगप्रकरणी तपास सुरू आहे.
यामध्ये डी गँगकडून स्फोटकांचा वापर करून राजकीय नेते, मोठे व्यापारी आणि भारतातील अन्य प्रतिष्ठित व्यक्तींवर हल्ले करून दहशत निर्माण करण्याचा कट आखण्यात आला असल्याची माहिती एनआयएला मिळाली आहे.