टिळकनगरमध्ये डान्स बारवर छापा; ४८ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 16:55 IST2019-11-04T16:52:07+5:302019-11-04T16:55:15+5:30
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू होता प्रकार, दोन दिवसांत दुसरी कारवाई

टिळकनगरमध्ये डान्स बारवर छापा; ४८ जणांना अटक
मुंबई - मालाडच्या खबरी डान्सबारवर केलेल्या कारवाईपाठोपाठ पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने टिळकनगर येथील देवीकृपा ऑर्केस्ट्रा बारमध्ये छापा टाकला. या कारवाईत ३६ ग्राहकांसह ४८ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
टिळकनगर येथील पी.एल. लोखंडे मार्गावर असलेल्या देवीकपामध्ये डान्स बार सुरू असल्याची माहिती लांडे यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी समजासेवा शाखेच्या मदतीने रविवारी पहाटेच्या सुमारास बारवर छापा मारला. यात ४ तरुणींची सुटका करत ४८ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यात ३६ ग्राहकांचा समावेश आहे. घटनास्थळावरून तपास पथकाने १० हजार रुपयांची रोकडही जप्त केली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, टिळकनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
या कारवाईपूर्वी शनिवारी पहाटेच्या सुमारास मालाडच्या काका बार आणि रेस्टारंटवर लांडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली होती. यात १० बारबालांची सुटका करण्यात आली. नुकत्याच उभारलेल्या एका मंदिरापासून काही अंतरावरच हा बार होता. एखाद्या घरासारखी याची रचना करत, यात पोलीस खबरी राहत असल्याचे त्यांनी भासविले होते. त्यानुसार, पोलिसांनी या ‘सेफ हाउस’च्या आतील डान्स बारचा पर्दाफाश करत, २२ जणांना बेड्या ठोकल्या. यात १४ ग्राहकांचा समावेश आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.