गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:12 IST2025-07-16T14:12:19+5:302025-07-16T14:12:43+5:30
Crime News : आसामच्या गुवाहाटीमध्ये एका पत्नीने आपल्या पतीची हत्या तर केलीच, पण त्याचा मृतदेह तिने आपल्याच बेडरूममध्ये पुरला.

गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
इंदूरच्या सोनम रघुवंशीचं प्रकरण ताजं असतानाच आता आसाममधून पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. आसामच्या गुवाहाटीमध्ये एका पत्नीने आपल्या पतीची हत्या तर केलीच, पण त्याचा मृतदेह तिने आपल्याच बेडरूममध्ये पुरला. ही महिला सोनमपेक्षाही चार पावलं पुढे निघाली.
आसाममधील गुवाहाटीच्या पांडू भागातील जॉयमती नगरमध्ये हे प्रकरण घडलं आहे. या ठिकाणी राहणाऱ्या ३८ वर्षांच्या रहीमा खातून नावाच्या महिलेला तिचा ४० वर्षांचा पती सबियाल रहमान याच्या दारू, भांडणं आणि मारहाणीचा प्रचंड त्रास होता. २६ जूनच्या रात्री या पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर रहीमाचं डोकं पूर्णपणे सटकलं आणि तिने आपल्या पतीची हत्या केली. इतकंच नाही, तर खून केल्यानंतर तिने स्वतः ५ फुटांचा खड्डा खोदला आणि त्यात मृतदेह पुरून टाकला. याच घरात ती शांततेत झोपली.
पोलीस ठाण्यात केले आत्मसमर्पण
सतत प्रयत्न करूनही संपर्क न झाल्याने सबियालच्या भावाने त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, १३ जुलै रोजी जालुकबारी पोलीस ठाण्यात स्वतः आरोपी पत्नीने आत्मसमर्पण केले. तिने पतीच्या हत्येची कबुली दिली. तिच्याच माहितीवरून पांडू येथील घरात पुरलेला तिच्या पतीचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला.
२६ जूनला घडला होता प्रकार
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पती भंगाराचा व्यवसाय करत होता. चौकशीदरम्यान आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, "२६ जूनच्या रात्री पती दारू पिऊन घरी आला होता. त्याने भांडायला सुरुवात केल्यावर मला इतका राग आला की, मी त्याची हत्या केली. त्यानंतर घरातच ५ फुटांचा खड्डा खोदला आणि मृतदेह पुरला."
शेजाऱ्यांना सांगितले 'पती केरळला गेलाय'
पोलिसांच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, आरोपी महिलेने शेजाऱ्यांना सांगितले होते की, तिचा पती कामासाठी केरळला गेला आहे. काही दिवसांनंतर ही महिला स्वतःही घरातून गायब झाली होती. दरम्यान, या हत्याकांडात आणखी काही लोक सामील असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. आरोपी महिलेला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.