क्वारंटाईन कालावधी घराबाहेर फिरणं पडलं महागात; चेंबूरमध्ये सलग दुसरा दिवशी रुग्णावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 21:17 IST2021-03-01T21:14:25+5:302021-03-01T21:17:38+5:30
The case was registered against the patient for the second day in Chembur: घरात क्वारंटाइन असतानाही बाहेर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. अशा लोकांवर थेट गुन्हा दाखल केला जात आहे.

क्वारंटाईन कालावधी घराबाहेर फिरणं पडलं महागात; चेंबूरमध्ये सलग दुसरा दिवशी रुग्णावर गुन्हा दाखल
मुंबई - बाधित रुग्णांची संख्या मुंबईत वाढत असल्याने महापालिकेने कडक नियम लागू केले आहेत. मात्र कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या नियमांना बाधित रुग्ण हरताळ फासत असल्याचे समोर येत आहे. क्वारंटाइन कालावधी सुरू असताना घराबाहेर फिरणाऱ्या चेंबूर अतुर पार्क येथील रुग्णावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी पुन्हा येथील स्वस्तिक अथर्व या इमारतीत बाधित रहिवाशी बाहेर फिरत असल्याने महापालिकेने त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईतील कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. गेल्या महिन्यात तीनशेपर्यंत बाधित रुग्णांची संख्या होती. यामध्ये वाढ होऊन गेल्या दोन आठवड्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज एक हजार रुग्ण सापडत असल्याने महापालिकेने कठोर नियम केले आहेत. त्यानुसार घरात क्वारंटाइन असतानाही बाहेर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. अशा लोकांवर थेट गुन्हा दाखल केला जात आहे.
चेंबूर येथील स्वस्तिक अथर्व या उत्तुंग इमारतींमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला १९ फेब्रुवारी रोजी कोविड झाल्याचे आढळून आले. त्यामुळे नियमानुसार त्यांना १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे लागणार होते. हा कालावधीत ४ मार्च २०२१ रोजी पूर्ण होणार आहे. मात्र हा कालावधी पूर्ण होण्याआधी सदर व्यक्ती घराबाहेर फिरत असल्याचा सोमवारी दिसून आले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याने संबधित व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.