Punjab AAP MLA: बलात्काराचा आरोप असलेला पंजाबमधील सनौरचा AAP आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याची माहिती समोर आली आहे. अटकेनंतर स्थानिक पोलिस ठाण्यात नेले जात असताना, पठाणमाजरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, ज्यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. तसेच, आमदाराने पोलिसांवर चारचाकी घालण्याचाही प्रयत्न केला. पोलिस पथक सध्या त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पठाणमाजरा याच्या माजी पत्नीच्या तक्रारीवरुन नोंदवलेल्या बलात्काराच्या जुन्या प्रकरणात ही कारवाई केली जात आहे. हा एफआयआर पटियालाच्या सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी पंजाब पोलिसांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथून आरोपी आमदाराला अटक केली होती. स्थानिक पोलिस ठाण्यात नेले जात असताना, आमदार पठाणमाजरा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर गोळीबार केला.
हरमीत सिंग पठाणमाजरा याच्यावर नेमका काय आरोप ?पोलिसांच्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी एका महिलेने पठाणमाजराविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. आमदाराने घटस्फोटित असल्याचे सांगून तिच्याशी संबंध ठेवले आणि नंतर विवाहित असूनही २०२१ मध्ये तिच्याशी लग्न केले. यानंतर, मंगळवारी सकाळी पोलिसांनी आमदाराला हरियाणातील करनाल येथून ताब्यात घेतले. स्थानिक पोलिस ठाण्यात नेताना हे संपूर्ण नाट्य घडले.