कोरेगाव मूळ पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर सशस्त्र हल्ला; कुटुंबीयांना मारहाण, महिलेशी गैरवर्तन; घरातून १ लाखांची रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 20:02 IST2026-02-08T19:59:41+5:302026-02-08T20:02:31+5:30
Pune ZP, Panchayat Samiti Election news: फिर्यादी सुरज चौधरी हे पंचायत समिती हवेली सदस्य पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उमेदवार होते, त्यामुळे हा हल्ला निवडणूक वादातून झाला का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

कोरेगाव मूळ पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर सशस्त्र हल्ला; कुटुंबीयांना मारहाण, महिलेशी गैरवर्तन; घरातून १ लाखांची रोकड लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
उरुळी कांचन (ता. हवेली): हवेली पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या सुरज भालचंद्र चौधरी यांच्या घरावर सशस्त्र जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ८) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पेठ चारवाडावस्ती येथे घडली. या हल्ल्यात कुटुंबीयांना गंभीर मारहाण करण्यात आली असून महिलेशी गैरवर्तन, घराची तोडफोड व १ लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 36/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 118(1), 333, 189(2), 191(2), 190, 115(2), 352, 351(2), 351(4) अंतर्गत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुरज चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते घरात असताना गावातील विजय रामचंद्र चौधरी व त्यांचा मुलगा ओम चौधरी हे चाकू व लोखंडी रॉडसह घरात घुसले. यावेळी वडील भालचंद्र चौधरी व भाऊ अक्षय यांना मारहाण करण्यात आली. अक्षय यांच्या पोटावर चाकूने वार करण्यात आला. मारहाण थांबविण्यासाठी मध्ये पडलेल्या आई शोभा चौधरी यांचे केस ओढून त्यांचा ब्लाऊज फाडण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.
यानंतर तानाजी विलास चौधरी, हर्षद राजेश चौधरी व विशाल दीपक चौधरी हेही घरात घुसले. सर्व आरोपींनी मिळून सुरज चौधरी, त्यांचे वडील व भाऊ संदेश यांना लोखंडी रॉड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हल्ल्यानंतर आरोपींनी घरातील साहित्याची तोडफोड करून पलायन केले. घटनेनंतर घराची पाहणी केली असता कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली १ लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले. जखमींवर वैद्यकीय उपचार करून घेण्यात आले असून त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.
विशेष म्हणजे, फिर्यादी सुरज चौधरी हे पंचायत समिती हवेली सदस्य पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत उमेदवार होते, त्यामुळे हा हल्ला निवडणूक वादातून झाला का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. प्रकरणाचा तपास सहा. फौज सस्ते करीत असून, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे. आरोपींच्या अटकेबाबत पोलीस तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.