Pune Accident: दुचाकीवर झाड पडून नव विवाहित जोडप्याचा मृत्यू; भाची गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 23:52 IST2022-04-22T23:51:58+5:302022-04-22T23:52:12+5:30
एक सात वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे.

Pune Accident: दुचाकीवर झाड पडून नव विवाहित जोडप्याचा मृत्यू; भाची गंभीर
पुरंदर तालुक्यातील सासवड वीर रस्त्यावर आज सायंकाळी रस्त्याच्या कडेला असलेले झाड अंगावर पडल्याने परिंचे येथील नव विवाहित जोडप्याचा मृत्यू झाला. तर एक सात वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, आज दिनांक २२ एप्रिल रोजी सायंकाळी पाउस व वादळ वारा सुरु झाला. यावेळी मयत रेनुकेश गुणशेखर जाधव वय २९ वर्ष व त्याची पत्नी सारिका रेनुकेश जाधव वय २३ वर्ष त्याच बरोबर त्याची भाची ईश्वरी संदेश देशमुख हे सासवडहून परिंचेकडे मोटार सायकलवर जात होते. साधारण सात वाजलेच्या सुमारास पिंपळे येथून जात असतांना रस्त्या शेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची भाची (बहिणीची मुलगी) गंभीर जखमी झाली. घटने नंतर परिसरातील नागरीक मदतीला धावले.
पोलिसानी तातडीने घटना स्थळी धाव घेऊन अपघात ग्रास्थांना सासवड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र तो पर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. तर मुलगी बेशुध्द अवस्थेत असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. रेनुकेश जाधव हा पिरींचे येथील पत्रकार गुणशेखर जाधव यांचा एकुलता एक मुलगा होता तर रेनुकेश आणि सारिका यांचा चार महिन्या पूर्वीच विवाह झाला आहे .या घटने मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .