Public morcha on Police station against Fountain Hotel owner | फाउंटन हॉटेल चालकाविरोधात पोलीस ठाण्यावर धडक

फाउंटन हॉटेल चालकाविरोधात पोलीस ठाण्यावर धडक

ठळक मुद्देपोलीसांनी हॉटेलच्या ३६ जणांना तर गावातील ८ जणांना अटक केली होती. गावातील लोकांवर अन्याय कराल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

मीरारोड - पान खाण्यासाठी गेलेल्या घोडबंदर गावातील मुलांना दुचाकी लावण्यावरुन फाऊंटन हॉटेलच्या बाऊंसर, कर्मचारायांनी केलेल्या मारहाणी वरुन उसळलेल्या दंगलीचे संतपत पडसाद आगरी समाजात उमटले आहेत. ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील आगरी समाजाच्या प्रतिनिधींनी काशिमीरा पोलीस ठाण्याला घेराव घालून संताप व्यक्त केला. हॉटेल मालक भाजपाचा असल्याने पोलीस आणि पालिका त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत आगरी समाज दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील वरसावे नाका येथे असलेल्या फाऊंटन हॉटेलवर पान खाण्यासाठी गेलेल्या घोडबंदर गावातील तरुणांना त्यांची दुचाकी उभी करण्यावरुन हॉटेलचे बाऊंसर, रखवालदार आदींनी शिवीगाळ करत दमदाटी, मारहाण केली. याची माहिती गावात कळताच गावातील रहिवाशी हॉटेलवर गोळा झाले. तर हॉटेलचे कर्मचारी देखील मोठ्या संख्येने जमले होते. वादावादी वाढत जाऊन त्याचे पर्यवसन तुंबळ हाणामारी, दगडफेक, सोडा वॉरच्या बाटल्या फेकण्यात झाले. यात ग्रामस्थांसह एक पोलीस जखमी झाला. पोलीसांनी हॉटेलच्या ३६ जणांना तर गावातील ८ जणांना अटक केली होती.

दरम्यान या घटनेचे पडसाद आगरी समाजात उमटले. आज सोमवारी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्यासह आगरी समाजाचे प्रमुख शांताराम ठाकुर, सुरेश पाटील, प्रभाकर म्हात्रे, केशव घरत, चिंतामण पाटील, राजु ठाकुर तसेच मोठ्या संख्येने पालघर - ठाण्याचे आगरी समाजाचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी काशिमीरा पोलीस ठाण्याला घेराव घातला.

या वेळी फाऊंटन हॉटेलचा मालक तलाह मुखी स्वत: घटनेत सहभागी असल्याचे सांगत मुखी हा भाजपाचा असल्याने त्याला पोलीस, पालिका आदी संरक्षण देत असल्याचा आरोप आगरी समाजाच्या प्रतिनिधींनी केला. सदर हॉटेल आदिवासींच्या जागेवर असुन बेकायदा बांधकाम आणि खोट्या परवानग्या घेतल्या आहेत. यांचेच दिल्ली दरबार इन हे गॅरेजच्या परवानगीच्या नावाखाली घोडबंदर येथेच बेकायदा हॉटेल आहे. रात्रभर ही हॉटेलं कशी चालतात ? असा सवाल करत या ठिकाणी गैरप्रकार चालत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले.

पानखाण्यासाठी गेलेल्या गावातील मुलांना केवळ दुचाकी उभी करण्या वरुन इतकी गुंडगीरी करणाराया हॉटेलवाल्याकडे शस्त्रे आली कुठून याचा शोध घ्या. हॉटेल मालक आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करुन अटक करा. गावातील मुलांना गंभीर जखमा झाल्या असुन त्यानुसार कलमं लावा, गावातील लोकांवर अन्याय कराल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी उपस्थित पोलीस उपअधिक्षक शांताराम वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक व्यंकट आंधळे, काशिमीरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक वैभव शिंगारे यांनी आगरी समाज व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकुन घेतले. यावेळी पोलीस कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे वळवी यांनी आश्वास्त केले. जखमींचे वैद्यकिय अहवाल येतील त्या प्रमाणे कलमं लावली जातील. कायद्या नुसार कारवाई करु अशी ग्वाही वळवी यांनी दिली. पोलीसांनी या प्रकरणात एकुण तीन गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस आणि ग्रामस्थांच्यावतीने तसेच हॉटेल चालकाच्यावतीने दिलेल्या फिर्यादीनुसार हे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Public morcha on Police station against Fountain Hotel owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.