अभिमानास्पद! धामणगावचे सुपुत्र बनले लडाखचे 'हेड ऑफ पोलीस'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 17:32 IST2019-10-31T17:29:52+5:302019-10-31T17:32:59+5:30
पहिला बहुमान : सात वर्षे महाराष्ट्रात सेवा

अभिमानास्पद! धामणगावचे सुपुत्र बनले लडाखचे 'हेड ऑफ पोलीस'
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे (अमरावती) - जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवून जम्मू काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केल्यानंतर लडाखचे पहिले हेड ऑफ पोलीस म्हणून धामणगावचे सुपुत्र सतीश खंडारे यांनी ३१ ऑक्टोबरपासून कार्यभार स्वीकारला आहे.
सन १९९५ मध्ये भारतातून ४२५ वी रँक घेऊन आयपीएस झालेले सतीश श्रीराम खंडारे यांनी धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयातून इयत्ता दहावीची परीक्षा सन १९८६ मध्ये ८६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण केली. त्यानंतर धामणगाव शहरातील सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून ते बारावी उत्तीर्ण झाले. पुणे येथील सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन ते १९९२ मध्ये बीई झाले. त्यानंतर १९९५ मध्ये ते आयपीएस बनले. आयपीएस अधिकारी सतीश खंडारे हे प्रथम जम्मू काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला.
महाराष्ट्रात सात वर्षे सेवा
जम्मू काश्मीर येथे सेवारत असलेल्या सतीश खंडारे यांनी प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात सात वर्षे सेवा दिली. सन २००५ मध्ये हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक, सन २००७ मध्ये पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षक, तर सीआरपीएफ नागपूर येथे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, नवी मुंबई भागातील खारघर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या विभागात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून सेवा दिली. त्यानंतर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये दाखल होऊन दोन वर्षे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला.
पोलीस विभागात दाखल होण्याचे स्वप्न त्याने जिद्दीने पूर्ण केले. आता लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले पोलीस महासंचालक म्हणून काम करण्याचा बहुमान त्याला मिळाला आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. - श्रीराम खंडारे, आयपीएस सतीश खंडारे यांचे वडील