Prisoner Rajesh Gavkar death case: Jail Superintendent arrested from Nagpur | कैदी राजेश गावकर मृत्यू प्रकरण: कारागृह अधीक्षक नागपूरमधून ताब्यात; सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई 

कैदी राजेश गावकर मृत्यू प्रकरण: कारागृह अधीक्षक नागपूरमधून ताब्यात; सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई 

सावंतवाडी : सावंतवाडी कारागृहातील कैदी राजेश गावकर याच्या मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल असलेला सावंतवाडी कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक योगेश पाटील याला अखेर रविवारी दुपारी नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.याला सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांनी ही दुजोरा दिला असून पुढील दोन दिवसात पाटील याला सावंतवाडीत आणण्यात येणार आहे.या प्रकरणातील झिलबा पाढरपिसे हा मात्र अद्याप फरार आहे.

सावंतवाडी कारागृहात साधी कैद भोगत असलेला देवगड येथील राजेश गावकर याला कारागृह अधीक्षक योगेश  पाटील यांच्यासह त्याचा साथीदार झिलबा पाढरपिसे याने माराहण केली होती.त्यात गावकर हा जखमी झाला होता.मात्र त्याच्यावर उपचार करण्यात आले नव्हते.सहकारी कैद्यांनी माहीती देऊनही रूग्णालयात दाखल करण्यात आले नाही त्यातच गावकर याचा 19 फेब्रुवारी ला मृत्यू झाला होता.मात्र हा मृत्यू मारहाणीत झाला नसून आजारी असल्यानेच झाला असे सांगण्यात आले होते.

मात्र कारागृहात असलेल्या सहकारी कैद्यांनी गावकर याच्या मृत्युनंतर कारागृहात उपोषण केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती.सावंतवाडी पोलिसांनी सुरूवातीला अक्समित मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.मात्र या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे ठरवले पोलीस अधीक्षक गेडाम यांनी कणकवली पोलीस उपअधीक्षक याच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक तयार केले आणि त्यांनी या प्रकरणी सखोल तपास केला होता.त्याना सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी ही मदत केली होती.

या प्रकरणी कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने कारागृहात येऊन ज्या ठिकाणी गावकर हा मृत्यू मुखी पडला होता.त्या जागेवर इतर जागेची पाहणी केली यात गावकर याच्याशरीरावर असलेल्या जखमाचा हा तपास केल्यानंतर तसा अहवाल पोलीस अधीक्षक यांना दिला होता.त्यामुळेच तब्बल 48 दिवसांनी कारागृह अधीक्षक योगेश पाटील व सुभेदार झिलबा पाढरपिसे याच्यावर गावकर याच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार झाले होते.पाटील व पाढरपिसे यांनी सुरूवातीला सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.मात्र तेथील जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.पण चार दिवसापूर्वी तेथील ही अर्ज फेटाळून लावला होता.त्यामुळे या दोघांना ही अटक होणार हे निश्चित होते.

सिंधुदुर्ग पोलिसांचे एक पथक पाटील व पाढरपिसे याच्या मार्गावर होते.त्यातच रविवारी दुपारी प्रमुख आरोपी योगेश पाटील याला नागपूर येथून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.त्याला दोन दिवसांनी सावंतवाडीत आणण्यात येणार आहे.याबाबत सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांना विचारले असता कारागृहा अधीक्षक योगेश पाटील याला नागपूर येथे ताब्यात घेण्यात आले असून दोन दिवसांनी  त्याला सावंतवाडीत आणण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Prisoner Rajesh Gavkar death case: Jail Superintendent arrested from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.