Prince's body part found in Kalyan creek | ऑनर किलिंग प्रकरण : कल्याण खाडीत प्रिन्सीचे धड सापडले
ऑनर किलिंग प्रकरण : कल्याण खाडीत प्रिन्सीचे धड सापडले

ठळक मुद्देत्या करुन कल्याण खाडीत फेकून दिलेला कंबरेवरचा भाग महात्मा फुले चौक पोलिसांनी अग्निशमन विभाग आणि कोळीबांधवांच्या मदतीने बुधवारी दुपारी शोधून काढला. तिचे शिर अद्याप सापडले नसल्याने गुरुवारी पुन्हा शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.

कल्याण - परधर्मीय मित्रासोबत असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध करत अरविंद तिवारी (४७) याने त्याची मुलगी प्रिन्सी (२२) हिची हत्या करुन कल्याण खाडीत फेकून दिलेला कंबरेवरचा भाग महात्मा फुले चौक पोलिसांनी अग्निशमन विभाग आणि कोळीबांधवांच्या मदतीने बुधवारी दुपारी शोधून काढला. मात्र, तिचे शिर अद्याप सापडले नसल्याने गुरुवारी पुन्हा शोध मोहिम राबविण्यात येणार आहे.

मुंबईत काम मिळाल्यानंतर आधी विक्रोळी परिसरात राहणारा अरविंद मागील सहा वर्षांपासून टिटवाळा येथील इंदिरानगर येथे राहत होता. त्याच्यासोबत त्याची मोठी मुलगी प्रिन्सीदेखील राहायला आली. १२ वीपर्यंत शिक्षण झालेली प्रिन्सी मुंबईत भांडुप येथे कामाला लागली. तिथे तिची ओळख एका परधर्मीय मुलासोबत झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि ही बाब तिचे वडील अरविंद यांना कळली. याच रागातून अरविंदने ६ डिसेंबर रोजी अत्यंत क्रुरपणे प्रिन्सीची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तीन तुकडे करुन मृतदेहाचा वरचा भाग आणि शीर कल्याणच्या खाडीत फेकून दिले. कंबरेखालचा भाग फेकण्यासाठी कल्याणमध्ये आलेल्या अरविंदचे बिंग रिक्षाचालकामुळे फुटले आणि तो पोलिसांच्या हाती लागला.

कल्याण येथील खाडीत प्रिन्सीचा मृतदेह फेकल्याची माहिती अरविंदने चौकशीदरम्यान दिल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी प्रिन्सीच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना अपयश आल्याने बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली. चार तासाच्या शोध मोहिमेनंतर ३ किलोमीटर अंतरावर प्रिन्सीचे शीर नसलेले धड पोलिसांना सापडले. गुरुवारी पुन्हा तिचे शीर शोधले जाणार आहे.


प्रियकराचीही चौकशी

प्रिन्सीची आई उत्तरप्रदेश येथून कल्याणला येण्यासाठी निघाली असून तिच्या चौकशीतून आणखी काही माहिती मिळते का, याचा पोलीस प्रयत्न करणार आहेत. प्रिन्सीच्या प्रियकरालादेखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याचे वृत्त आहे. प्रिन्सी मुंबई येथे कामाला लागल्यापासून अरविंदसोबतच घरातून बाहेर पडत होती. अरविंद तिला भांडुप येथे सोडायचा आणि नंतर पुढे जायचा. परत येतानासुध्दा हे दोघे एकत्रच घरी यायचे. त्यामुळे घराजवळ असलेल्या दुकानातसुध्दा अरविंद प्रिन्सीला पाठवत नव्हता. कामावरुन घरी आलेली प्रिन्सी पुन्हा घराबाहेर पडतच नव्हती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: Prince's body part found in Kalyan creek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.