राष्ट्रपती शौर्य पदक विजेत्या अग्निशामक दलाच्या जवानाला आग विझविताना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:02 IST2019-03-13T15:00:53+5:302019-03-13T15:02:09+5:30
राष्ट्रपती शौर्य पदक विजेत्या जवानाला मारहाण करण्याचा खळबळजनक प्रकार टिंगरेनगर येथे मध्यरात्री घडला़.

राष्ट्रपती शौर्य पदक विजेत्या अग्निशामक दलाच्या जवानाला आग विझविताना मारहाण
पुणे : टिंगरेनगर येथे कचऱ्याला लागलेली आग विझवित असताना आमच्या हद्दीतील आग विझविण्यास कोणी सांगितले ; असे म्हणून एकाने राष्ट्रपती शौर्य पदक विजेत्या जवानाला मारहाण करण्याचा खळबळजनक प्रकार टिंगरेनगर येथे मध्यरात्री घडला़. विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.
राजाराम बबन टिंगरे (वय ५७) आणि सुरज राजाराम टिंगरे (रा़ मुंजाबावस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़. या प्रकरणी सुनिल सोपान देवकर (वय ५३, रा़. नवी खडकी, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, येरवडा अग्निशमन केंद्रात ते ड्युटीवर असताना विमाननगर येथील एका शोरुमला आग लागल्याचा कॉल होता़. तेथील काम पूर्ण करुन रात्री पावणे बारा वाजता ते परत येत असताना त्यांना धानोरी येथे कचऱ्याला आग लागली असल्याचा कॉल आला़. ते त्याठिकाणी सुनिल टिंगरे यांच्या बंगल्यासमोर आगीच्या ठिकाणी पोहचले़ व आग विझवण्याचे काम सुरु केले़. त्यावेळी तेथे राजाराम टिंगरे हे आले़ ते अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करु लागले़. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करुन काम करीत असताना दत्ता माने यांनी त्यांना समजावून परत पाठविले़ ते पुन्हा आले़. त्यांचा मुलगा सुरजही शिवीगाळ करु लागला़. त्यांनी देवकर यांच्या हातातील पाईप ओढण्याचा प्रयत्न करु लागला़ ही जागा माझ्या मालकीची आहे़. तुम्हाला येथे कोणी बोलावले ते सांगा, असे म्हणून देवकर यांच्या अंगावर धावून गेले़. त्यांचा शर्ट ओढून हाताने मारहाण करु लागले़. त्यात देवकर यांच्या शर्टची पाच बटणे तुटली. तसेच त्यांच्या पोटात लाथ मारली़ तोपर्यंत पोलीस तेथे आले व त्यांनी दोघांना ताब्यात घेतले़.