प्रेम, अनैतिक संबंध अन् ३ हत्या! घरात सुरू होती दिवाळीची तयारी, पण पत्नीची एक चूक जीवावर बेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:24 IST2025-10-20T16:24:33+5:302025-10-20T16:24:57+5:30
आकाश पत्नीला वाचवण्यासाठी आला मात्र त्याच्यावरही आशुने चाकू हल्ला केला. त्यात आकाशनेही आशुकडून चाकू हिसकावून घेत त्याच्यावर प्रतिहल्ला केला.

प्रेम, अनैतिक संबंध अन् ३ हत्या! घरात सुरू होती दिवाळीची तयारी, पण पत्नीची एक चूक जीवावर बेतली
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या प्रतापनगर मेट्रो स्टेशनजवळ एक कुटुंब राहत होते. या कुटुंबात पती आकाशसोबत पत्नी शालिनी आणि २ मुली राहायच्या. या दोघांनी ७ वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. आकाश ई रिक्षा चालवायचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र या कुटुंबात एक वादळ आलं आणि सर्व काही उद्ध्वस्त झाले. प्रेमाच्या त्रिकोणात गर्भवती महिला शालिनी, तिच्या गर्भात वाढणारं बाळ, तिचा प्रियकर यांचा जीव गेला आणि पती आकाश गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.
लग्नानंतर आकाशचं कुटुंब त्याच्यावर नाराज होते. त्यामुळे शालिनी आणि आकाश नबी करीम परिसरात आशु नावाच्या व्यक्तीच्या घरी भाड्याने राहत होते. तिथे राहत असताना शालिनी आणि आशु यांची मैत्री झाली. शालिनीने तिच्या पतीला सोडून आशुसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आशुसोबत ती पंजाबमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. हे दोघे जवळपास ८ महिने सोबत राहिले. त्यावेळी शालिनी गर्भवती राहिली. शालिनीचा भाऊ रोहितने सांगितले की, आशुने एकेदिवशी शालिनीच्या २ मुलींना मारहाण केली होती. त्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून शालिनी २ महिन्यापूर्वी आशुला सोडून पुन्हा पती आकाशकडे राहायला आली. आकाशने तिच्या चुकीला माफी करत पुन्हा संसार सुरू केला.
धनत्रयोदशीला शालिनी तिच्या आईला भेटायला माहेरी गेली होती. आकाश त्याच्या ई रिक्षातून पत्नी आणि २ मुलींना घेऊन प्रतापनगरहून नबी करीमला येत होता. मात्र घराजवळ पोहचताच आशुने अचानक आकाश आणि शालिनीला एकत्र पाहून त्यांच्यावर हल्ला केला. आशुने पहिले आकाशला चाकू मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी राहिला. त्यातच आरोपीने अचानक शालिनीच्या छातीवर, पोटावर आणि शरीरावरील अन्य भागांवर चाकूने सपासप वार केले. आकाश पत्नीला वाचवण्यासाठी आला मात्र त्याच्यावरही आशुने चाकू हल्ला केला. त्यात आकाशनेही आशुकडून चाकू हिसकावून घेत त्याच्यावर प्रतिहल्ला केला.
या हल्ल्यात आशु आणि शालिनी यांचा जागेवरच मृत्यू झाला तर आकाश गंभीररित्या जखमी झाला होता. ही घटना शालिनीच्या २ मुलींसमोर घडली. शालिनीच्या मृत्यूने कुटुंबात शोककळा पसरली. आकाश आणि शालिनी सर्वकाही विसरून एकत्रित संसाराला लागले होते. दोघेही खुश होते. घरात दिवाळीची तयारी सुरू होती. शनिवारी दिवसभर खरेदी केल्यानंतर शालिनी आणि आकाश कुटुंबाला भेटायला गेले होते. आकाशने मुलांसाठी कपडेही खरेदी केले होते. मात्र या हत्याकांडानंतर शालिनीच्या दोन्ही मुलांवरचं आईचे छत्र हरपलं आहे. आशु गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता, त्याच्यावर ३ गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. सध्या या प्रकरणात पोलीस प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानुसार पुढील कार्यवाही करत आहेत.