गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 16:13 IST2025-08-24T16:12:59+5:302025-08-24T16:13:26+5:30
महेंद्र आणि स्वाती यांच्यात काही दिवसांपासून घरगुती वाद होत होता. याच वादातून महेंद्रने आपल्या गर्भवती पत्नीची हत्या केली.

गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
तेलंगणाची राजधानी हैद्राबादच्या मेडचल जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मेडिपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पतीने आपल्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या केली. एवढ्यावरच न थांबता त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि काही नदीत फेकून दिले, तर काही लपवून ठेवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पती महेंद्र रेड्डी याला अटक केली आहे. महेंद्रने २२ वर्षीय स्वाती उर्फ ज्योतीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. दोघे मेडिपल्लीच्या बोडुप्पल भागात एका भाड्याच्या घरात राहत होते. विकाराबाद जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले हे जोडपे एक महिन्यापूर्वीच बोडुप्पल येथे राहायला आले होते. महेंद्र कॅब चालवण्याचे काम करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र आणि स्वाती यांच्यात काही दिवसांपासून घरगुती वाद होत होता. याच वादातून महेंद्रने आपल्या गर्भवती पत्नीची हत्या केली. घटनेच्या वेळी त्यांच्या घरातून मोठा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी आत डोकावून पाहिले असता त्यांना स्वातीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत एका बॅगमध्ये दिसला. हा प्रकार पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महेंद्रला ताब्यात घेतले. मृतदेहाचे तुकडे करून तो पुरावा नष्ट करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना आढळले. स्वातीच्या दिराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्वातीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, तिच्या आईचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे.