Atul Subhash : हॉटेलची खोली... डॉक्टर आणि नर्स बनले पोलीस; निकिताच्या घरच्यांना कशी झाली अटक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:06 IST2024-12-16T16:04:01+5:302024-12-16T16:06:03+5:30
Atul Subhash : निशा आणि तिचा मुलगा अनुराग सिंघानिया यांना पोलिसांनी अटक केली.

Atul Subhash : हॉटेलची खोली... डॉक्टर आणि नर्स बनले पोलीस; निकिताच्या घरच्यांना कशी झाली अटक?
एआय इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्येप्रकरणी वाँटेड असलेली अतुल सुभाषची सासू निशा आणि तिचा मुलगा अनुराग सिंघानिया यांना ११ डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी अटक केली. प्लॅननुसार, बंगळुरू पोलिसांनी आई आणि मुलगा ज्या हॉटेलमध्ये राहत होते त्याच हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्या होत्या. रात्रभर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर सकाळी त्यांना पकडण्यात आलं आणि त्यानंतर वाराणसीमार्गे विमानाने ते बंगळुरूला पोहोचले.
मेहुणा अनुराग जौनपूर येथील घराला कुलूप लावून फरार झाला. यानंतर दोघेही झुंसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलमध्ये पोहोचले आणि रूम घेऊन थांबले. याच दरम्यान, जौनपूर व इतर ठिकाणांहून शोधकार्यात गुंतलेल्या पोलिसांना अचूक माहिती मिळाली. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी बंगळुरू पोलिसातील दोन पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले.
पोलिसांनी रात्रभर दोघांवर ठेवली नजर
डॉक्टर आणि नर्स असल्याचं सांगून त्यांनी स्वतंत्र खोल्या बुक केल्या. रात्री आई आणि मुलाच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली आणि शनिवारी सकाळी पोलिसांचं पथक आरोपींच्या खोलीत दाखल झालं. सुमारे दोन तास चौकशी केल्यानंतर पोलिसांचं पथक आरोपींसोबत वाराणसीला रवाना झालं. १२ डिसेंबर रोजी आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता, पोलिसांना त्याचा सुगावा लागला आणि त्यानंतर लोकेशन ट्रेस करून कारवाई केली, असंही सांगण्यात आलं.
बंगळुरू पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये निशा आणि अनुरागच्या अटकेचा उल्लेख केला आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय आरोपींचा न्यायालयाकडून रिमांडही घेण्यात आलेला नाही. प्रयागराज पोलीस अधिकारीही याबाबत काहीही बोलण्याचे टाळत आहेत.
बंगळुरू पोलिसांच्या टीमसोबत जौनपूरला आलेले एसआय रंजीत कुमार यांनी सांगितलं की, शनिवारी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बंगळुरू पोलिसांनी प्रयागराज आणि गुरुग्राम येथून आरोपींना २४ तासांच्या आत बंगळुरू न्यायालयात हजर केले. तेथून सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.