सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:05 IST2025-10-30T18:04:22+5:302025-10-30T18:05:33+5:30
Powai Hostage Case: पवईत १७ मुलांना ओलीस ठेवल्याची घटना घडली होती. दुपारी १ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत तब्बल ३ तास या मुलांना डांबून ठेवले होते

सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
मुंबई - पवईत आरए स्टुडिओला ऑडिशनच्या नावाखाली बोलवण्यात आलेल्या मुलांना ओलीस ठेवल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी रोहित आर्यने व्हिडिओ व्हायरल करत मी दहशतवादी नाही, माझ्या काही मागण्या आहेत असं म्हटलं होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपीसोबत चर्चेचा प्रयत्न केला. त्याचवेळी काही पोलीस शिताफीने स्टुडिओच्या बाथरूममधून आत शिरले. याठिकाणी रोहित आर्य आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचे पुढे आले. या चकमकीत आरोपी जखमी झाल्याचं सांगितले गेले. मात्र आता आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे.
पवईत १७ मुलांना ओलीस ठेवल्याची घटना घडली होती. दुपारी १ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत तब्बल ३ तास या मुलांना डांबून ठेवले होते. या सर्व मुलांना ऑडिशनसाठी बोलवण्यात आले होते. ६ दिवसांपासून ही मुले ऑडिशनला जात होती. मात्र दुपारी दीड वाजता मुले जेवणासाठी बाहेर आली नाही. तेव्हा रोहित आर्यने मुलांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी या मुलांच्या सुटकेसाठी तातडीने ऑपरेशन राबवले. त्यावेळी बाथरूममधून आत गेलेल्या पोलिसांचा रोहित आर्यसोबत चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात रोहितच्या डाव्या बाजूला छातीजवळ गोळी लागली. त्यानंतर जखमी झालेल्या आरोपीला ट्रॉमा हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
मुलांवर हल्ला करण्याच्या होता तयारीत?
बाथरूममधून पोलीस आर ए स्टुडिओमध्ये शिरले होते. त्यात रोहित आर्यने पोलिसांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात तो जखमी झाला. रोहित आर्य डांबून ठेवलेल्या मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्यात पोलिसांनी वेळीच सतर्कता बाळगली. मुलांची सुखरूप सुटका करणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होते.
सरकारने २ कोटी थकवल्याचा आरोप
आरोपी रोहित आर्य याने सरकारवर २ कोटी थकवल्याचा आरोप केला होता. गेल्या वर्षभरापासून तो पैसे मिळावेत यासाठी आंदोलन, उपोषण करत होता. दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना त्याला स्वच्छता मॉनेटरचे टेंडर मिळाले होते. माझी शाळा, सुंदर शाळा अशी संकल्पना त्याने मांडली होती. या कामाचे २ कोटी रुपये सरकारने थकवले होते. मात्र सरकारकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने रोहितने प्लॅनिंग करून हे अपहरण नाट्य घडवले. त्यात १७ मुलांना डांबून त्याने डांबून ठेवले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला आहे.