पोलीस कर्मचारी एकमेकांना भिडले, एकाने दुसऱ्याच्या डोक्यात घातला हातोडा; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 10:07 IST2025-01-05T10:06:38+5:302025-01-05T10:07:34+5:30
कोटाच्या गुमानपुरा पोलीस ठाण्यात दोन पोलिसांची एकमेकांशी जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली.

पोलीस कर्मचारी एकमेकांना भिडले, एकाने दुसऱ्याच्या डोक्यात घातला हातोडा; नेमकं कारण काय?
कोटा : राजस्थान पोलिसांत सध्या वातावरण चांगले नाही. एकीकडे एसआय भरती परीक्षेत कॉपी करून वर्दी मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, कोटाच्या गुमानपुरा पोलीस ठाण्यात दोन पोलिसांची एकमेकांशी जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसाच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. त्यामुळे जखमी पोलिसाला रुग्णालयात दाखल करावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी कोचिंग सिटी कोटाच्या गुमानपुरा पोलीस ठाण्यात पोलिसांमध्ये हाणामारी झाली. हेड कॉन्स्टेबल बलबीर सिंह हे पोलीस ठाण्यात काही काळ गैरहजर होते. ड्युटी हजेरीच्या मुद्द्यावरून त्यांचा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुरेंद्र सिंह या आणखी एका पोलिसाशी बाचाबाची झाली. काही वेळातच दोघांमधील वाद वाढला. यानंतर हेड कॉन्स्टेबल बलबीर सिंह यांनी तिथे ठेवलेला हातोडा उचलून सुरेंद्र सिंग यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे सुरेंद्र सिंह यांच्या डोक्याला दुखापत झाली.
या घटनेनंतर पोलीस ठाण्यातील इतर पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस ठाण्यातच ही घटना घडल्याने पोलीस अधिकारी हे प्रकरण दडपण्यात व्यस्त होते. मात्र, प्रकरण दाबता आले नाही. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत हेड कॉन्स्टेबल बलबीर सिंह यांना सायंकाळी उशिरा पोलीस ठाण्यातून निलंबित करण्यात आले.
गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
आरोपी पोलीस कर्मचारी बलबीर सिंह यांच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या गुमानपुरा पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस ठाण्यात पोलिसांमध्ये घडलेली ही घटना विभागात चर्चेचा विषय बनली आहे. ही मारामारी हजेरीच्या मुद्द्यावरून झाली की, त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध पोलीस अधिकारी घेत आहेत.