कारवाई न करण्यासाठी लाच मागणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 23:14 IST2019-02-15T23:13:32+5:302019-02-15T23:14:32+5:30
शाम हरी आयरे असं या उपनिरीक्षकाचे नाव असून गेल्या पाच दिवसांतील मुंबई पोलीस दलातील लाचखोर अधिकारी अटक होण्याची ही तिसरी घटना आहे.

कारवाई न करण्यासाठी लाच मागणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात
मुंबई - भजन मंडळातील महिलेने दिलेल्या तक्रारीवर कारवाई करू नये यासाठी तरुणाकडून ४० हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या पथकाने आज अटक केली. शाम हरी आयरे असं या उपनिरीक्षकाचे नाव असून गेल्या पाच दिवसांतील मुंबई पोलीस दलातील लाचखोर अधिकारी अटक होण्याची ही तिसरी घटना आहे.
भजन मंडळातील महिलेने त्याच्याच मंडळातील तरुणाविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. याबाबतचा तपास अधिकारी म्हणून उपनिरीक्षक शाम हरी आयरे हे काम पाहत होते. या तक्रार अर्जावर पुढील कारवाई करू नये यासाठी आयरे याने या आरोपी तरुणाकडे ५० हजारांची मागणी केली. त्यापैकी १० हजार रुपये या तरुणाने आयरे याला दिले होते. नंतर आयरे याने उर्वरित ४० हजारांसाठी तरुणाकडे तगादा लावला. पैसे द्यायचे नसल्याने या तरुणाने एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची शहनिशा करून एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि शाम आयरे याला ४० हजार घेताना रंगेहाथ अटक केली.