In the police van the accused ghas taken bite of police | पोलीस व्हॅनमध्येच आरोपीने घेतला पोलिसाचा चावा
पोलीस व्हॅनमध्येच आरोपीने घेतला पोलिसाचा चावा

ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली

मुंबई - दिल्लीत वकील विरुद्ध पोलीस यांच्यातील मारहाण प्रकरण पेटत असताना, मुंबईतहीपोलिसांवर हल्ले सुरूच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला कसेबसे पकडून व्हॅनमध्ये भरले. त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना, त्याने दारूच्या नशेत पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. नशेतच सहायक फौजदाराच्या हातावर कडकडून चावा घेतल्याची धक्कादायक घटना कुर्ल्यामध्ये घडली. यात एक पोलीस जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे, तर या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी आरोपी मिर्झा आलम अजीम शेखला अटक केली आहे.

कुर्ला परिसरात मिर्झा याचा दारूच्या नशेत धिंगाणा सुरू होता. स्थानिकांनाही तो शिवीगाळ करत मारहाण करत होता. मंगळवारी रात्री ११च्या सुमारास याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. त्यानुसार, घटनेची वर्दी मिळताच कुर्ला पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार काशीनाथ पुकळे (५७) हे शिपायांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मिर्झाला ताब्यात घेताच त्याने पोलिसांना धक्काबुकी केली. पोलिसांनी त्याला कसेबसे व्हॅनमध्ये बसविले. व्हॅनमध्येही तो पोलिसांनाच शिवीगाळ करत धक्काबुकी करत खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता. त्याला पोलीस ठाण्यात नेत असताना त्याने काशीनाथ यांच्या हाताचा जोरात चावा घेतला. त्यामुळे पोलीस ठाण्याऐवजी आधी काशीनाथ यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. मिर्झा हा कुर्ला येथील रहिवासी असून, तो हातगाडी चालविण्याचे काम करतो. सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कुर्ला पोलिसांनी दिली.

धारावीतही मारहाण

दुसऱ्या घटनेत धारावी मेन रोड परिसरात रविवारी रात्री उशिरापर्यंत वाढदिवसानिमित्त सुरू असलेला डीजे बंद करण्यासाठी गेलेल्या धारावी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर घोरपडे (५७) यांना धक्काबुकी करत मारहाण केली. प्रेम नावाच्या व्यक्तीने विरोध करत धक्काबुकीला सुरुवात करताच, त्याच्यापाठोपाठ आणखी दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर, घोरपडे यांनी पोलिसांना बोलावून घेतले. मात्र, तोपर्यंत आरोपी पसार झाला. या प्रकारामुळे घोरपडे यांचा उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

Web Title: In the police van the accused ghas taken bite of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.