प्रवासी, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 03:27 IST2020-03-20T03:27:13+5:302020-03-20T03:27:29+5:30
तो मुलगाही सारखा रडत होता. त्याला प्रवाशांनी विचारून पाहिले, पण तो काही दाद लागू देत नव्हता. त्यातूनच एका प्रवाशाने रेल्वे पोलिसांच्या १५१२ या हेल्पलाइनवर फोन करून याची माहिती पोलिसांना दिली.

प्रवासी, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला मुलगा
- जगदीश भोवड
एक व्यक्ती साधारणपणे दोन वर्षांच्या मुलाला घेऊन उपनगरी रेल्वेने मुंबईच्या दिशेने प्रवास करीत होती. मात्र त्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. त्या रेल्वे डब्यातून प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांना त्याच्या हालचाली खटकल्या होत्या. तो मुलगाही सारखा रडत होता. त्याला प्रवाशांनी विचारून पाहिले, पण तो काही दाद लागू देत नव्हता. त्यातूनच एका प्रवाशाने रेल्वे पोलिसांच्या १५१२ या हेल्पलाइनवर फोन करून याची माहिती पोलिसांना दिली. वसईकडून मुंबईकडे निघालेली ती लोकल थोड्याच वेळात दहिसर रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होती.?
हेल्पलाइनवर मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षाने लगेचच ही माहिती दहिसर रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी ताबडतोब हालचाल करून त्या ठरावीक डब्यात प्रवेश करीत त्या संशयास्पदरीत्या प्रवास करणाºया प्रवाशाला मुलासह ताब्यात घेतले. रेल्वे स्टेशनवर उतरून त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्याच्याविषयीचा संशय आणखीनच बळावला. त्यामुळे त्याला त्या लहान मुलासह बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात आणले गेले. या आरोपीचे नाव सनी उर्फ पुरुषोत्तम कमलेश वर्मा असे होते. सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देणा-या आरोपी सनीला पोलिसी खाक्या दाखवला गेल्यावर मात्र तो पोपटासारखा बोलू लागला. अखेर त्याने मुलाचे नाव सांगितले.
पालघर जिल्ह्यातील वालीव गावातील खैरपाडा येथील तो मुलगा होता. त्या मुलाच्या शेजारीच आरोपी राहात होता. शेजारीच राहात असल्यामुळे त्या कुटुंबातील लोकांशी त्याचे चांगले संबंध होते. त्या मुलाबरोबर तो अधूनमधून खेळतही असायचा. त्या दिवशी त्याने त्या मुलाला ‘बाहेर खेळायला नेतो’ असे सांगितले तेव्हा म्हणूनच त्या कुटुंबाने त्याला नाही म्हटले नाही. ‘बाहेर खेळायला घेऊन जातो’ असे सांगण्यामागे त्याच्या मनात काही काळेबेरे असेल असा साधा संशयही कुणाला आला नाही. त्या कुटुंबाचा विश्वास संपादन करूनच त्याने हा प्लॅन आखला होता. त्या प्लॅनप्रमाणे आरोपीने त्या लहान मुलाला बाहेर खेळायला नेले होते. मात्र थोडा वेळ वाट पाहिल्यानंतरही आरोपी सनी उर्फ पुरुषोत्तम कमलेश वर्मा हा मुलाला घेऊन परत आला नाही. त्यामुळे मग त्याला वारंवार फोन केला; पण तो फोनही उचलत नव्हता. त्यामुळे त्या मुलाच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्या बिचाºया आई-वडिलांच्या मनात भलतेसलते विचार येऊ लागले. त्याआधी पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या वालीव परिसरातच एका मुलाचे अपहरण झाले होते. नंतर अपहरणकर्त्याने त्या मुलाचा खून केला होता. त्यामुळे आपल्या मुलाच्या बाबतीतही असे काही घडले तर..? या विचाराने त्या आई-वडिलांच्या मनाचा थरकाप उडाला होता. आता काय करावे? कुणाला सांगावे? ते सैरभैर झाले होते. त्यातूनच त्यांनी लगेचच वालीव पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपला मुलगा हरवल्याचा गुन्हा दाखल केला होता.
मुलाला बाहेर खेळायला घेऊन गेलेला आणि गायब झालेला आरोपी सनी वर्मा हा मूळचा उत्तर प्रदेशातील होता. त्यामुळेच तो मुलाला घेऊन उत्तर प्रदेशात पळून जाण्याचीही शक्यता होती. तसेच कदाचित तो ओडिशालाही जाऊ शकतो, अशीही शंका उपस्थित केली जात होती. वालीव पोलिसांनी तक्रार दाखल होताच त्यानुसार आपला शोध आरंभला होता, मात्र त्याच वेळी इकडे उपनगरी रेल्वेत एक वेगळेच नाट्य रंगले होते. एरवी कुणाच्याही अध्यातमध्यात नसलेले उपनगरी रेल्वे प्रवासी काही चुकीचे घडत आहे असे लक्षात येताच सजग होतात. तसाच प्रकार त्या दिवशी घडला होता. आरोपी सनी वर्माच्या हालचाली संशयास्पद आहेत हे लक्षात येताच प्रवाशांनीच पुढाकार घेऊन रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनला फोन केला होता. बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन आरोपीला मुलासह ताब्यात घेतले होते.
प्रवाशांनी दाखविलेली सजगता आणि रेल्वे पोलिसांनी दाखविलेले प्रसंगावधान यामुळे अपहरण झालेल्या त्या छोट्या मुलाला ताब्यात घेऊन आरोपीच्या चौकशीत त्याने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे पोलिसांचे एक पथक वालीव गावात दाखल झाले. तेथे केलेल्या चौकशीदरम्यान घटना खरी असल्याचे आणि वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर आरोपी आणि मुलाला वालीव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्या मुलाला त्याच्या आई-वडिलांकडे सोपवले गेले. त्या वेळी त्या मुलाच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांच्या चेहºयावर पसरलेला आनंद अवर्णनीय असाच होता.
आरोपी सनी वर्मा याने नेमक्या कोणत्या उद्देशाने त्या मुलाचे अपहरण केले होते? त्या मुलाच्या कुटुंबीयांशी चांगले वागून त्यांच्या या लाडक्या मुलाला पळवून नेण्यामागे निश्चितच त्याचा उद्देश चांगला नव्हता हे स्पष्टच आहे. कदाचित त्या मुलाचे अपहरण करून त्याला खंडणी उकळायची असेल. कदाचित त्या मुलाला कायमचा अपंग करून भीक मागायला लावायचे असेल. अशा प्रकारच्या टोळ्या मुंबई आणि अन्य परिसरात कार्यरत आहेतच. या टोळ्यांकडून अनेक लहान मुलांची अपहरणे होत असतात. ठरावीक काळाने अशा अपहरणाच्या घटना वारंवार घडत असल्याचे आपण वर्तमानपत्रांत वाचत असतो. ज्यांची मुले हरवतात आणि कधीच सापडत नाहीत किंवा अपहरण झालेल्या मुलांचे खंडणीसाठी खून होतात, अशा घटना घडलेल्या आपण वाचत असतो, तेव्हा आपल्या मनात चर्रर्र होते. आपले मन हळहळते. मात्र हा मुलगा सुदैवी होता. सजग प्रवासी आणि प्रसंगावधान बाळगणारे पोलीस यांच्यामुळे तो वाचला होता.
या प्रकरणातील आरोपी हा अशा टोळीचा सदस्य नाही हे तपासात उघड झाल्याची माहिती बोरीवली रेल्वे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी दिली. मात्र कुटुंबाचा विश्वास संपादन करून मुलाचे अपहरण करणारा हा आरोपी कोणत्याही थराला जाऊ शकला असता, असे ते म्हणाले. हा आरोपी अशा टोळीचा सदस्य नसला तरी त्याने त्या मुलाचे नेमके काय केले असते हे सांगता येत नाही. कदाचित खंडणीसाठी त्याने त्या मुलाचे अपहरण केले होते असेल. खंडणी मिळाली नाही, तर असे लोक संबंधित मुलांच्या जिवाचे बरे-वाईट करायलाही मागे-पुढे पाहत नाहीत... त्यामुळे त्या मुलाचे नशीब बलवत्तर होते म्हणूनच तो वाचला, असेच म्हणता येईल.