हवालाचे पैसे महाराष्ट्रात पोहोचण्याआधीच गायब; पोलिसांनीच हडपले १.४५ कोटी, महिला अधिकाऱ्याची 'डील' फसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:05 IST2025-10-13T13:52:29+5:302025-10-13T14:05:35+5:30
मध्य प्रदेशात महिला पोलीस अधिकाऱ्याने हवालाचे पैसे लुटल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

हवालाचे पैसे महाराष्ट्रात पोहोचण्याआधीच गायब; पोलिसांनीच हडपले १.४५ कोटी, महिला अधिकाऱ्याची 'डील' फसली
MP Police Hawala Case: मध्य प्रदेशात पोलिसांच्या एका मोठ्या गैरकारभाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिवनी जिल्ह्यात हवाल्याचे पैसे जप्त केल्यावर, पोलिसांनीच त्यातील मोठा हिस्सा आपसात वाटून घेतला. गाडीत सापडलेल्या एकूण २.९६ कोटी रुपयांच्या रकमेपैकी सुमारे १.४५ कोटी रुपये गायब झाले. या चोरीच्या आणि गैरव्यवहाराच्या आरोपाखाली पूजा पांडे या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासह एकूण १० पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
पोलीस अधिकारी पूजा पांडे यांना एका गुप्त बातमीदाराने सांगितले की, एका 'क्रेटा' कारमधून कटनीहून महाराष्ट्रातील नागपूरकडे ३ कोटी रुपये नेले जाणार आहेत. या माहितीनुसार, पूजा पांडे आणि त्यांच्या टीमने हायवेवर ती कार थांबवली आणि कारमधील सर्व पैसे पोलिसांच्या गाडीत भरले. ही घटना ८-९ ऑक्टोबरच्या रात्री घडली. पूजा पांडे यांच्या नेतृत्वाखाली एनएच-४४ वर वाहन तपासणी सुरू होती. ही गाडी कटनीहून नागपूरला जात होती. रात्री १ ते २ वाजण्याच्या दरम्यान. पोलिसांनी महाराष्ट्र नोंदणी क्रमांक असलेल्या या कारला थांबण्याचा इशारा केला, पण ती थांबली नाही. त्यानंतर पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग केला. शेवटी, कार चालकाला सिलादेही परिसरात गाडी थांबवावी लागली.
अमर उजालाच्या वृत्तानुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी हवाला व्यावसायिक सोहन परमार हा त्याच्या साथीदारांसह थेट पोलीस प्रमुख पूजा पांडे यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला. सूत्रांनुसार, अनेक तास या दोघांमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. अखेरीस, अर्धे पैसे तुम्ही ठेवा, अर्धे आम्हाला द्या असा सौदा झाला. पोलिसांनी १.५ कोटी रुपये स्वतःकडे ठेवले आणि बाकीचे पैसे व्यापाऱ्याला परत दिले.
मात्र, व्यापाऱ्याला परत मिळालेल्या रकमेत २५ लाख ६० हजार रुपये कमी असल्याने आढळली. यामुळे चिडलेल्या व्यापाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये येऊन गोंधळ घातला. हा गोंधळ स्थानिक माध्यमांपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी केलेला गैरव्यवहार उघड झाला. त्यामुळे या घटनेची जोरदाक चर्चा सुरू झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन तत्काळ चौकशीचे आदेश दिले. ९ ऑक्टोबरला ९ पोलीस कर्मचाऱ्यांवर, तर १० ऑक्टोबरला पूजा पांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी अजूनही सुरू आहे.
दरम्यान, पूजा पांडे, अर्पित भैराम, मखन, रविंदर उईके, जगदीश यादव, योगेंद्र चौरसिया, रितेश,नीरज राजपूत, केदार, सदाफल ही निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.