सुनील शर्मा नावाचा कोणी व्यक्तीच नाही! पोलिसांनी उभा केला बनावट तक्रारदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 07:42 IST2025-07-25T07:39:27+5:302025-07-25T07:42:32+5:30

महाराष्ट्र सायबरने मुंबई  हायकोर्टात खोटा तक्रारदार हजर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

Police set up a fake complainant | सुनील शर्मा नावाचा कोणी व्यक्तीच नाही! पोलिसांनी उभा केला बनावट तक्रारदार

सुनील शर्मा नावाचा कोणी व्यक्तीच नाही! पोलिसांनी उभा केला बनावट तक्रारदार

डॉ. खुशालचंद बाहेती
लोकमत न्यूज नेटवर्क


मुंबई :महाराष्ट्र सायबरने मुंबई  हायकोर्टात खोटा तक्रारदार हजर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंकड यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्र सायबरकडे सुनील शर्मा यांनी झी टीव्हीवरील ‘तुमसे तुम तक’ या मालिकेची ५० वर्षीय पुरुष आणि २० वर्षांच्या तरुणीच्या प्रेमकथेमुळे भावना दुखावतात, अशी तक्रार केली. महाराष्ट्र सायबरच्या अतिरिक्त महासंचालकांनी ३० जून २०२५ रोजी झी टीव्हीला ‘चौकशी पूर्ण होईपर्यंत मालिका प्रसारित करू नये,’ असे निर्देश दिले. याला हायकोर्टात आव्हान दिल्यानंतर ३ जुलै रोजी महाराष्ट्र सायबरने चौकशी बंद केल्याची माहिती कोर्टात दिली.

झी टीव्हीने हायकोर्टात सांगितले की, तक्रारीतील पत्त्यावर सुनील शर्मा नावाचा कोणीही राहत नाही. त्यांच्या अधिकाऱ्याने पत्त्यावर भेट दिली असता, तिथल्या सुरक्षारक्षकानेही हेच सांगितले.

महाराष्ट्र सायबरचे नोडल अधिकारी, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी कोर्टाला सांगितले की, तक्रारदार दुसऱ्याच ठिकाणी सापडले. त्यानंतर एक व्यक्ती ‘सुनील शर्मा’ म्हणून कोर्टात हजर करण्यात आली. कोर्टाला त्याचे आधार कार्ड व मतदार ओळखपत्रात नाव ‘महेन्द्र संजय शर्मा’ असल्याचे लक्षात आले.  कोर्टाने त्याला कागदावर सही करण्यास सांगितले. त्याने ‘सुनील शर्मा’ अशी सही केली. त्यानंतर त्याला  ओळखपत्र दाखवून पुन्हा सही करण्यास सांगण्यात आले. त्याने कोर्टासमक्ष केलेल्या तिन्ही सह्या तक्रारीवरील सह्यांशी जुळल्या नाहीत.

उच्च न्यायालयाची टिप्पणी
पोलिस अधिकाऱ्याचे  वर्तन अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. कोर्टाची फसवणूक करण्याचा कोणताही प्रयत्न आणि चुकीच्या माहितीवर असो वा हेतुपुरस्सर, खोटा तक्रारदार कोर्टात सादर करणे क्षम्य  नाही. हा महेंद्र संजय शर्मा स्वत:ला सुनील शर्मा म्हणत असला, तरीही सर्व उपलब्ध दस्तऐवजांवरून हे खोटे आहे. न्यायालयात खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते.
 

Web Title: Police set up a fake complainant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.