गोव्यात अभिनेत्रीसमोर अश्लील वर्तन, विकृत दुचाकीस्वाराचा पोलिसांकडून शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:37 IST2025-02-25T12:36:05+5:302025-02-25T12:37:01+5:30
अभिनेत्रीने घडलेला प्रकार सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे ही माहिती व्हायरल झाली.

गोव्यात अभिनेत्रीसमोर अश्लील वर्तन, विकृत दुचाकीस्वाराचा पोलिसांकडून शोध सुरू
पणजी : मोटारसायकलवरून आलेल्या एका विकृत व्यक्तीने अभिनेत्रीसमोर अश्लील वर्तन केल्याचा प्रकार राजधानी पणजीतील एका रस्त्यावर घडला. 'त्या' अभिनेत्रीने हा प्रकार सोशल मीडियावर 'पोस्ट' करून उघड केला. यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीची तक्रार घेत संशयिताचा तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पाटो-पणजी येथील एका बँकेसमोरील रस्त्यावरून अभिनेत्री आणि तिची मैत्रिण जात असताना संशयित पिवळ्या वेस्पा स्कूटरवरून आला आणि तिच्याशी 'एक्स्युझ मी' असे म्हणून संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर त्याने तिच्या समोरच अश्लिल वर्तन सुरू केले.
राजधानीत भररस्त्यावर हे विकृतीचे प्रदर्शन घडविण्याची आगळीक त्या संशयिताने केली. या अभिनेत्रीने घडलेला प्रकार सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे ही माहिती व्हायरल झाली. दरम्यान, पोलिसांनी अभिनेत्रीशी संपर्क साधून तक्रार नोंदवून घेतली. तसेच, अज्ञाताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.
दरम्यान, रस्त्याच्या आजूबाजूला उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळवून संशयिताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, उत्तर गोव्याच्या पोलिस अधीक्षकांनी समाज माध्यमावर ट्विट करून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचे म्हटले आहे.